नागपूर : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासून गाजत असलेला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्त्येचा मुद्दा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीने चर्चेत आला. पवार या गावाला भेट देऊन आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार जाणार आहेत. त्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. दोन्ही सभागृहातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या क्रूर हत्त्येचा निषेध करीत दोषींवर कडक कारवाीची मागणी केली. सरकारच्यावतीने या मुद्याला सविस्तर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही कालच सभागृहात दिली. या प्रकरणामुळे अडचणीत आलेले महायुतीचे मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. त्यांचा सहकारी वाल्मिक कराड याला अटक करावी ही मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्याला त्यांच्या उत्तरात याला बगल दिली.
हेही वाचा : कारागृहातील अर्थकारणावर आता “डिजिटल वॉच”; कैद्यांसह भेटायला येणाऱ्यांचे…
शनिवारी शरद पवार यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या गावाला भेट देण्याचा निर्णय घेतला. तशी माहिती पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे आता या मुद्यावर राजकारण अधिक तापन्याची चिन्हे दिसू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर या प्रकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मौन बाळगले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केल्यावर अजित पवार यांनी आता तेथे जाऊन भेट देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या भेटीकडे लक्ष लागले आहे.