सारथी संस्थेचे प्रमुख अमर वझलवार यांची खंत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
नागपूर : लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना विदर्भात मोठय़ा प्रमाणात संधी आहे. लघुउद्योगाचे मोठे केंद्र होण्यासाठी शहरही सक्षम आहे. सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत लघुउद्योगांवर शासनाने काही जाचक अटी लादल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्राला प्रोत्साहन मिळत नाही. परिणामी, मध्यमवर्गीय युवक या क्षेत्रात येऊ पाहत नाहीत, अशी खंत सारथी या संस्थेचे प्रमुख अमर वझलवार यांनी व्यक्त केली.
लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. वझलवार म्हणाले, ८० ते ९० च्या दशकात विदर्भ इंड्रस्टीज असोसिएशनच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय संघटनांमध्ये सक्रिय होऊन काम सुरू केले. आजारी उद्योगाचे पुनर्जीवन, औद्योगिक विकास, मागासलेल्या भागाचा म्हणजे विदर्भाचा विकास यावर भरपूर काम केले. लघुउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यासाठी नवउद्योजकांना तयार करण्यासाठी मदत केली. दरम्यानच्या काळात अनेक अडचणी आल्या. मात्र, त्या अडचणींवर मात केली. समाजाने आपल्यासाठी काही केले तर आपणही सारथ्य स्वीकारून काही केले पाहिजे, या कल्पनेतून सारथी हे नाव समोर आले. त्याच नावाने १९९० मध्ये संस्थेची स्थापना झाली. व्यापार क्षेत्रासह क्रीडा क्षेत्रात काम करीत असताना लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचा अनुभव पाठीशी होता. भाऊ अनिरुद्धसोबत या क्षेत्रात काम सुरू केले. त्या काळात लघु उद्योग सुरू करताना मध्यमवर्गीयांना बँकेचे कर्ज मिळण्यापासून शासनाकडून मिळणाऱ्या परवानगीपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सरकारच्या धोरणामुळे लघुउद्योगांना चालना मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे सरकारकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहिलो. गेल्या चार-पाच वर्षांत उद्योगांमध्ये शिथिलता आली आहे. काही जाचक अटीमुळे लघुउद्योजक समोर येत नाहीत. ज्यावेळी आम्ही संस्था सुरू केली होती त्यावेळी आमचे वडील सांगायचे, समाजाला आपण काही देणे लागतो. त्यामुळे स्वार्थ न ठेवता सारथी बना. सारथीने केवळ लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासाठीच काम केले नाही तर कलावंतांचे आणि शहरातील विकासाचे प्रश्न, रोजगार आणि शिक्षणासाठी संधी, पार्किंग
समस्या यासाठीही काम केले. विदर्भात विकास यात्रा काढली. पर्यटन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात विकासाच्या संधी आहेत. मात्र, त्या दृष्टीने विदर्भातील अनेक पर्यटन स्थळे विकसित करण्यात आली नाहीत.
अष्टविनायकांची ओळख करून दिली
विदर्भातील अष्टविनायकांबाबत अनेकांना माहिती नव्हती. सारथीची स्थापना झाल्यानंतर श्रीपाद चितळे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांनी विदर्भातील विविध स्थळांना भेट देत विदर्भातील अष्टविनायकांची माहिती जनतेसमोर आणली. संस्कार भारतीच्या माध्यमातून आकर्षक रांगोळी जगात पोहोचली. परंतु सारथीने त्यांची धरमपेठतील आदित्य लॉजमध्ये सुरुवात केली होती.
विदर्भात चित्रनगरी व्हायला हवी
विदर्भातील अनेक गुणी कलावंत मुंबईमध्ये चित्रपट क्षेत्रात काम मिळावे, यासाठी धडपड करीत असतात. सारथीने विदर्भात चित्रनगरी स्थापन व्हावी असा प्रयत्न सुरू केला. २०१०-११ मध्ये राज्य शासनाने सांस्कृतिक धोरण निश्चित केले आणि त्यात नागपूर शहरात चित्रनगरीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बावनकुळे यांनी जागेची उपलब्धता बघून सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. चित्रनगरी झाली तर मोठय़ा प्रमाणात रोजगाराचे साधन निर्माण होईल आणि विदर्भातील कलावंतांना मुंबई- पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही, असेही वझलवार म्हणाले.
२०० पेक्षा अधिक मान्यवरांना ‘सारथी’ सन्मान
उद्योगासह सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सारथीच्यावतीने दरवर्षी सारथी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. आतापर्यंत २०० पेक्षा अधिक मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले आहेत. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर सारथीशी जोडले गेले, याकडेही वझलवार यांनी लक्ष वेधले.