वर्धा: सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी चंदन पाल यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. सेवाग्राम आश्रमात संपन्न सेवा संघाच्या ९०व्या अधिवेशनात देशभरातील १५ राज्यातून तीनशेवर प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यात अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया ज्येष्ठ गांधीवादी रमेश ओझा (मुंबई) यांनी पार पाडली. अध्यक्षपदासाठी पाल यांचा एकच अर्ज आल्याने पुढील तीन वर्षासाठी त्यांची निवड झाली.
आजच्या अधिवेशनात मणीपूर विषयक केंद्र शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध करणारा ठराव संमत झाला. मणीपूर येथे जातीय हिंसेत हजारो निरपराध लोकांचा बळी गेला. यात केंद्र सरकारने निष्काळजीपणा दाखविल्याची टिका झाली. त्यासोबतच गाजापट्टीत शांतता निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. येत्या १५ दिवसात सर्व सेवा संघाच्याद्वारे देशभरात गांधी विचार विरोधी कृतीचा निषेध तसेच त्या विरोधात लढाई मजबूत करण्याचा निर्णय झाला. देशातील १५२ जिल्हा सर्वाेदय मंडळाचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहे.
हेही वाचा… ताडोबात सात वाघ एकाच वेळी एकत्र
आजच्या अधिवेशनात सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा, सेवा संघाचे विश्वस्त शेख हुसेन, सचिव गौरांग महापात्र, डॉ.आनंदकुमार, सोमनाथ रोडे, डॉ.सुगन बरंठ, रमेश दाणे, रमेश झाडे, टीआरएन प्रभू, अशोक शरण, अविनाश काकडे, चिन्मय मिश्र, सुदाम पवार, बजरंग सोनवणे, अरविंद अंजूम, ज्ञानेश्वर ढगे आदींनी आपले विचार मांडले.