लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोंदिया : केंद्र शासनाने पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा साकारून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारात करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काही शाळांमध्ये परसबागा तयार करण्यात आल्या आहे. आता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. बक्षिसेही दिली जाणार आहे. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तसे परिपत्रक ५ सप्टेंबर रोजी जारी केले. विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकविलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याचा मानस शासनाचा आहे. केंद्र शासनाच्या पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी २०२३-२४ या वर्षात गोंदिया जिल्ह्यातील जि. प.च्या १०३९ शाळांमध्ये परसबागा साकारण्याचे जिल्हा शिक्षण विभागाने निर्धारित केले आहे.

आणखी वाचा-सोयाबीनवर किड, बळीराजा संकटात; उत्पादनात घट होण्याची भीती

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर आयोजन केले जाणार आहे. तालुकास्तरावर प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रुपये तसेच प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर १ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपये तर प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर २ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. राज्यस्तरावर प्रथम ५५ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार रुपये तर प्रत्येकी ३ शाळांना प्रोत्साहनपर ११ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.

आणखी वाचा-आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार बैलपोळयाची संध्या

हवामानानुसार भाज्यांची लागवड, विविधता, देशी वाणांचा वापर, मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर, परसबागेचे व्यवस्थापन, सेंद्रिय परसबाग, सिंचन पद्धत, शाळेमधील टाकाऊ पदार्थांचा उपयोग, विद्यार्थी, पालक, शिक्षक, विद्याद्यार्थ्यांच्या सहभागासह लोकसहभाग यात राहणार आहे. जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागातील सहायक, पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sattvic food now included in school nutrition gardens will be created in schools sar 75 mrj
Show comments