अमरावती : अवकाश निरीक्षक, अभ्यासक यांच्या दृष्टीने सूर्यमालेतील एक महत्त्वाचा ग्रह म्हणजे शनी होय. शनीच्या भोवतीने असलेल्या कड्यामुळे शनीचे वेगळेपण खुलून दिसते. शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीच्या जवळ राहणार आहे. या दिवशी शनी ग्रह हा अगदी सूर्यासमोर राहील. याला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास शनी व पृथ्वी यांचे सरासरी अंतर कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुंदर कडी चांगल्या प्रकारे दिसू शकते. तथापि ही कडी साध्या डोळ्यांनी नव्हे तर दुर्बिणीने पाहावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनीला एकूण ८२ चंद्र आहेत, यामध्ये सर्वांत मोठा चंद्र टायटन आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारायला २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १.२० लाख किमी व तापमान शून्याखाली १८० अंश सेल्सिअस आहे. या ग्रहाची घनता सर्वांत कमी आहे. शनीची कडी २.७० लाख किमीपर्यंत पसरलेली व बर्फाची आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट आहे. पृथ्वी ज्यावेळी शनीच्या विषववृत्त पातळीत असते, अशावेळी शनीचे कडे पृथ्वीवरून चांगल्या प्रकारे दिसू शकते. शनीचा अभ्यास करणारे पहिले मानवरहित यान ‘कॅसिनी’ आहे. व्हायोजर या मानवरहित यानानेदेखील शनीचे जवळून छायाचित्र घेतले असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत संभ्रम का? वडेट्टीवार यांचा प्रश्न

हेही वाचा – वर्धा : कुलगुरूनंतर आता प्र- कुलगुरूंचा महिलेशी वाद, प्रकरण भीतीपोटी तात्काळ पोलिसांकडे

२७ ऑगस्ट रोजी सूर्य मावळल्यानंतर लगेच शनी ग्रह हा पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. हा ग्रह रात्रभर आकाशामध्ये दिसेल. हा ग्रह रात्रभर काळसर व पिंगट रंगाचा व चमकदार दिसेल. त्यामुळे हा ग्रह ओळखता येईल. हा ग्रह पृथ्वीच्या जवळ आल्याने मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn close to earth on august 27 spectacular view through binoculars mma 73 ssb