अकोला : शनी ग्रह येत्या २९ मार्चला सध्याच्या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. काही जण या ग्रहाचा राशी बदल ‘पायी, पोटी आणि माथी’ या साडे सातीच्या स्वरूपात घेतात. कोट्यावधी कि.मी. अंतरावरील हे ग्रह पृथ्वीसाठी उपकारक आहेत. पृथ्वीकडे येणाऱ्या संकटांचा सामना या ग्रहांद्वारे होत असतो. येत्या २३ मार्चपासून शनी ग्रहाचे वलय देखील अदृश्य होणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
सर्व सामान्य माणसाला ग्रहांचे वलय अधिक आकर्षित करणारे असते. सूर्यमालेतील सहाव्या क्रमांकावर येणारा आणि नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल, असा शेवटचा ग्रह म्हणजे शनी. सर्वात सुंदर व वलयांकित शनी ग्रह आपली सूर्य प्रदक्षिणा सुमारे साडे एकोणतीस वर्षात पूर्ण करतो. हा ग्रह एका राशीत सुमारे अडीच वर्षे असतो. परिभ्रमण कक्षेतील पृथ्वी, शनी आणि सूर्य यांच्या स्थिती बदलामुळे दर पंधरा वर्षांनी हेच मनोहारी वलय काही कालावधीसाठी अदृश्य होत असते. ती स्थिती सध्या आली आहे. सुमारे नऊ महिने शनी ग्रहाच्या या अनोख्या वलयाचा आनंद घेता येणार नाही. गेल्या महिन्यात सूर्य सान्निध्यात शनी आल्याने पश्चिमास्त झालेला हा ग्रह ३१ मार्चपासून पहाटे पूर्व आकाशात दिसायला लागेल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
आकाशात पिवळसर, तपकिरी रंगाच्या वायुरूप ग्रहावर हायड्रोजन व हेलियम वायू अधिक प्रमाणात असून, सुर्यमालेत सर्वात कमी घनता असणारा ग्रह पाण्यात सहज तरंगेल एवढा हलका आहे.
सन १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून वलय टिपले. सुमारे ५० वर्षांनंतर त्याची ओळख पटली. छोट्या-मोठ्या बर्फाचे व खनिजांची एकंदर सात कडी असून त्याची लांबी सुमारे दोन लाख ८२ हजार कि.मी. आहे. जेव्हा सूर्याची किरणे शनी ग्रहाचे विषुववृत्त पट्ट्यावर पडतात, तेव्हा ही वलये दिसेनाशी होतात. ही स्थिती सुमारे नोव्हेंबरपर्यंत राहून पुढील वर्षी शनीची वलये पुन्हा बघता येणार आहेत. शनी ग्रहाला एकूण १४६ चंद्र असून यातील बहुतेक चंद्रांचा शोध ही वलये अदृश्य असतांनाच लागला आहे. १ एप्रिलपासून पहाटे पूर्व आकाशात दिसणारा शनी ग्रह पुढील वर्षीच्या ११ मार्चपर्यंत बघता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.