अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात आपल्याला विनाकारण गोवण्यात आले. धमकीशी आपला कुठलाही संबंध नव्हता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट माझ्या नावाने दाखवले. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, त्यामुळे मी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सौरभ पिंपळकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांद्वारे शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी धमकी प्रकरणात पुणे शहरातून सागर बर्वे (३४) याला अटक करण्यात आली. तसेच या प्रकरणी अमरावती येथील भाजपा कार्यकर्ते सौरभ पिंपळकर यांचे नाव घेण्यात येत होते. अखेरीस सात दिवसांनंतर सौरभ पिंपळकर यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.
हेही वाचा – बुलढाणा: हजारो आशा व गट प्रवर्तकांना दोन दिवसात मिळणार मानधन; जिल्हाव्यापी आंदोलनाचे फळ
शरद पवार यांचा दाभोळकर होईल, या पोस्टशी माझा काहीच संबंध नाही. असे कोणतेही ट्विट मी केले नाही किंवा शेअरही केले नाही. त्या ट्विटला मी लाईकसुद्धा केले नाही. मी जे ट्विट केले होते, त्यामध्ये औरंगजेब हा सुपारी कतरण खात होता, त्याचे तोंड वाकडे होऊन गेले, त्याची इतिहासात पुनरावृत्ती होणार, असे म्हटले होते. त्यात शरद पवार यांचे कुठेही नाव नव्हते. पण, त्यांनी माझ्यासोबत माझ्या पक्षालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत भारतीय जनता पक्ष खंबीरपणे उभा होता.
या प्रकरणाचा माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे माझ्या आई-वडिलांची आणि पक्षाची माफी मागणार का? असा प्रश्नसुद्धा सौरभ पिंपळकर यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, भाजपाचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी सौरभ पिंपळकर यांच्या कुटुंबाची माफी मागितली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.