भंडारा : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सावरकर कळावेत आणि स्वा. सावरकरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काढण्यात येणारी स्वा. सावरकर गौरव यात्रा भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातून सुरू होऊन तिचा समारोपही गांधी चौकात होणार आहे. ‘गांधी’ विरोधी स्वा. सावरकर गौरव यात्रेचा प्रारंभ आणि समारोपही ‘ गांधी’ चौकात होत असल्याने भाजपला ‘गांधीं’चाच आधार घ्यावा लागत आहे का ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
हेही वाचा >>> गडचिरोलीत उमेदवारीवरून आतापासूनच कुरघोड्या सुरू
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. वारंवार सावरकरांचा होणारा अपमान लक्षात घेता स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचा त्याग, देशाप्रती असलेले समर्पण नव्याने लक्षात घेता येईल, यासाठी या यात्रेचे आयोजन राज्यभरात करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा येथे ४ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात राजीव गांधी चौक ते गांधी चौकापर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून आणि सावरकर गौरव रथाच्या सोबतीने ही यात्रा काढण्यात येईल. गांधी चौकात यात्रेचा समारोप होणार आहे. मात्र काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान होतो असे सांगणाऱ्या जिल्ह्यातील भाजप पक्षाने त्याच त्रिमुर्ती चौक, शास्त्री चौक , हेडगेवार चौक अशा चौकाना डावलून गांधी चौकातून पदयात्रा काढणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही.