चंद्रपूर : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते असे म्हटले आहे. तसेच या विचारामुळे महिलांना भीती वाटत असल्याचेही त्या बोलताना दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार एका कार्यक्रमात बोलत होत्या. त्या आक्रमकरित्या आपले विचार मांडताना दिसून येत आहेत. आपल्या भाषणात सावरकरांवर टीका करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न सु्द्धा त्यांनी उपस्थित केला आहे. अशा माणसांची हे लोक यात्रा काढत असल्याचा चिमटाही शिवानीने काढला आहे.