महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: राज्यात विजेची मागणी घटल्याने महानिर्मितीसह इतर कंपन्यांनी वीजनिर्मिती कमी केली आहे. तर खुल्या बाजारातही विजेचे दर घसरले आहे. त्यामुळे महावितरणने करार केलेल्या कंपन्यांकडून वीज खरेदी आणखी कमी करत जुलैच्या पहिल्या १२ दिवसांत खुल्या बाजारातून ७४.१४ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. त्यामुळे महावितरणचे प्रतियुनिट १ रुपये वाचले आहे.
मुंबईचा काही भाग वगळता इतरत्र महावितरणकडून वीज पुरवठा होतो. महावितरण ही वीज औष्णिक, सौर, पवन ऊर्जासह इतर स्त्रोतांकडून तयार करणाऱ्या महानिर्मिती व इतर शासकीय व खासगी कंपन्यांकडून घेत असते. त्यासाठी लघु व दीर्घकालीन ‘वीज खरेदी करार’ करण्यात आले आहे. सध्या महावितरणने सुमारे ३९ हजार ५१ मेगावॅटचे करार विविध सरकारी व खासगी कंपन्यांसोबत केले आहे.
आणखी वाचा-नागपुरात डेंग्यू वाढतोय! किती रुग्ण आढळले पहा…
लघु व दीर्घकालीन करारानुसार महावितरणला संबंधित वीजनिर्मिती कंपनीला प्रतियुनिट एक निश्चित स्थिर आकार व राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरानुसार प्रतियुनिट दर अशी दोन्ही मिळून विजेची रक्कम अदा करावी लागते. सध्या विजेची मागणी सर्वत्र घटल्याने खुल्या बाजारात विजेचे दर घसरले आहेत. त्यामुळे महावितरणने राज्यातील वीज खरेदी करारातील विविध वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून वीज खरेदी कमी करत खुल्या बाजारातून १ जुलै ते १२ जुलै दरम्यान ७४.१४ दशलक्ष युनिट वीज खरेदी केली. ही वीज महावितरणला प्रतियुनिट ३.९२ रुपये दराने पडली. या विजेपोटी महावितरणने २९.०४ कोटी रुपये मोजले. सध्या महावितरणला वीज खरेदी करारानुसार सरासरी वीज दर प्रतियुनिट ४.९७ रुपये पडतो. तर सध्या खुल्या बाजारातून महावितरणने प्रतियुनिट वीज ३.९२ रुपये मिळवली. त्यामुळे महावितरणचे प्रतियुनिट १.०५ रुपये वाचले आहेत.
आणखी वाचा-गडचिरोली: दोन जहाल नक्षाल्यांचे आत्मसमर्पण
ग्राहकांना माफक दरात अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून महावितरणकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यानुसार जुलैच्या पहिल्या १२ दिवसांत महावितरणचे खुल्या बाजारातून वीज घेतल्याने १.०५ रुपये प्रतियुनिट वाचले आहे. -योगेश गडकरी, संचालक (वाणिज्य), महावितरण, मुंबई.
महावितरणने खुल्या बाजारातून घेतलेल्या विजेची स्थिती
दिनांक दशलक्ष युनिट रक्कम (कोटी) सरासरी दर (युनिट)
१ जुलै – २.०१ – ०.६४ – ३.२०
२ जुलै – २.९० – ०.८८ – २.८६
३ जुलै – ३.७१ – १.७० – ४.५७
४ जुलै – ८.६७ – ३.९५ – ४.५५
५ जुलै – १३.३४ – ५.६६ – ४.२४
६ जुलै – ६.३२ – २.५१ – ३.९७
७ जुलै – ४.५३ – १.४४ – ३.१८
८ जुलै – ४.०९ – १.३७ – ३.३५
९ जुलै- ६.३३ – १.५३ – २.४२
१० जुलै- ५.३५ – १.६९ – ३.१६
११ जुलै- ४.०० – २.१७ – ५.४३
१२ जुलै- १२.८८ – ५.५० – ४.२७
एकूण- ७४.१४- २९.०४ – ३.९२