चंद्रपूर : भद्रावती येथील तरुणीची ‘इन्स्टाग्राम’वर विदेशातील तरुणाने पायलट असल्याचे सांगून प्रेमाच्या जाळ्यात अडकविले व लग्नाचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांनी फसवणूक केली. भद्रावती पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. हा विदेशी तरुण इटली येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
भद्रावती येथे पंचशील वॉर्डांत वास्तव्याला असलेली पीडित तरुणी आई व दोन भावांसोबत राहते. आईला पेन्शन मिळते. तर मुलगी व तिचे दोन्ही भाऊ खासगी काम करतात. या २५ वर्षीय तरुणीची सोशल साइटवर ‘रिशान’ नामक मुलाशी ऑक्टोबर २०२२ मध्ये ओळख झाली. समाज माध्यमावर नियमित ‘चॅटिंग’ होत असल्याने दोघांची चांगली मैत्री झाली. त्याला वडील नसून तो एकटाच आहे व इटली या देशात पायलट असल्याचे त्याने सांगितले व तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. नंतर काही दिवसांनी भद्रावती येथील तरुणीसाठी इटली येथून एक पार्सल पाठविले असल्याचे त्याने सांगितले.
हेही वाचा >>> अकोला : पोलिसांत नोकरीचे आमिष, गणवेश व नियुक्तीपत्रही दिले, पण..
या पार्सलमध्ये २ आयफोन ७ मनगटी घड्याळे, ९ सोन्याचे दागिने, ८ कॉस्मेटिक, ३ बॅग तसेच १ लाख ५ हजार डॉलर ज्याची भारतीय रुपयांमध्ये किंमत ८६ लाख ८८ हजार ४८२ रूपये असल्याचे त्याने सांगितले. २ नोव्हेंबर २०२२ ला दिल्ली येथील विमानतळावरून तरुणीला फोन आला. यामध्ये ‘कस्टम क्लियरन्स चार्जेस’ च्या नावाखाली ३७ हजार रुपयांची मागणी केली. पैसे भरले नाही तर भद्रावती येथील तरुणीवर तसेच पाठविणाऱ्यावर सुद्धा खटला दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने ३७ हजारांची रक्कम भरली. मात्र, यानंतर तरुणीला सतत वेगवेगळी कारणे सांगून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर तरुणीने एकेक करत ९८ हजार २ लाख, १.५ लाख, ९० हजार, १० हजार, ५० हजार, २ लाख, ३ लाख असे करत एकूण ११ लाख ३५ हजार रूपये भरले. मात्र, सतत पैशांची मागणी होत असल्याने संशय येऊन पीडित तरुणीने आईसह भद्रावती पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. याआधारे भद्रावती पोलिसांनी तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. भद्रावतीचे ठाणेदार गोपाल भारती यांनी या फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.