चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघात काँग्रेसने बौध्द समाजातील सामान्य कार्यकर्ता प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली. परंतु, आर्थिकदृष्ट्या अशक्त या उमेदवाराला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले या ज्येष्ठ नेत्यांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. यापैकी एकही नेता व त्यांच्या समर्थकांचा प्रचारात सहभाग दिसत नाही.
काँग्रेसने प्रथमच या राखीव मतदार संघातून पडवेकर हा बौध्द समाजाचा उमेदवार दिला आहे. तेव्हा या उमेदवाराच्या पाठिशी राहणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसोबतच जिल्हा व शहर काँग्रेस समिती, महिला काँग्रेस तथा काँग्रेसच्या अन्य संघटनांचे कर्तव्य आहे. मात्र यात काँग्रेस संघटना व नेते मागे पडले आहेत. वडेट्टीवार यांनी पडवेकर यांच्यासाठी केवळ एक सभा घेतली. या सभेला खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले यांच्याशिवाय शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या एकमेव सभेनंतर काँग्रेसचे नेते व पदाधिकारी अजूनही पडवेकर यांच्या प्रचारापासून दूर असल्याचे चित्र आहे. वडेट्टीवार गटाचे एक दोन कार्यकर्ते सोडले तर सर्व जण घरी बसून आहेत. खासदार धानोरकर यांच्या गटाचे सर्व नेते व पदाधिकारी वरोरा येथे काँग्रेसचे लाडके भाऊ प्रवीण काकडे यांच्या प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे चंद्रपूरच्या राखीव जागेकडे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाध्यक्ष आमदार धोटे स्वत: राजुरा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांच्याकडे वेळ नाही. विशेष म्हणजे, काँग्रेस उमेदवार पडवेकर यांचे प्रचार कार्यालय सुरू झालेले नाही. आमदार सुधाकर अडबाले हे देखील प्रचारात सहभागी दिसत नाहीत. जिल्ह्यातील काही नेत्यांनी खासदार राहुल गांधी व खासदार मुकुल वासनिक यांच्या निदर्शनास ही बाब आणू दिली आहे. दलित समाजातून येणाऱ्या उमेदवाराकडे पक्षाचेच नेते व पदाधिकारी अशा पध्दतीने पाठ फिरवित असतील तर इतरांचे काय असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा… मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?
बंडखोराच्या दिमतीला मात्र फौजफाटा
काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात येऊन चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालय थाटणारे राजू झोडे यांच्या बंडखोरीला काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींचा पाठिंबा आहे. त्यामुळेच झोडे यांनी नामांकन मागे घेतले नाही. विशेष म्हणजे बंडखोरी करणाऱ्या झोडे यांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवक सक्रिय दिसत आहेत. त्यामुळे झोडे यांच्या उमेदवारीला कोणाची फुस आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.