वर्धा : शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीत घट दिसून येत असल्याने शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना परीक्षा परिषदेने खबरदार केले आहे. महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेने या संदर्भात काळजी व्यक्त करणारी सूचनावली राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवली आहे.
पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस दरवर्षी राज्यातून नऊ ते दहा लाख विद्यार्थी बसत असतात. या परीक्षांसाठी विद्यार्थ्याने पात्र होणे तसेच निकाल वाढविणे आवश्यक बाब आहे. मात्र शिष्यवृत्ती परीक्षेच्या गत पाच वर्षांच्या आकडेवारीचे अवलोकन केल्यावर बऱ्याच जिल्ह्यात परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतल्यास निकालाच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसून येत असल्याचे परीक्षा परिषदेने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर २०२४ च्या परीक्षेसाठी परिषदेने काही सूचना केल्या. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांची निवड करावी. त्यांच्याकडून आवेदन पत्र भरून घेण्याची कार्यवाही १ जूलै २०२३ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थी निश्चित करून सदर परीक्षेची पूर्व तयारी करणे शक्य होणार. काही वेळा अर्हतेसाठी आवश्यक असणारे गुण विद्यार्थ्यास प्राप्त होत नाही. त्यामुळे उपलब्ध संच वितरीत करता येत नाही. अशी संच शिल्लक राहण्याची बाब योग्य नसल्याचा शेरा परिषदेने नोंदविला. म्हणून शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच सर्व मुख्याध्यापकांची सभा शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी. त्यात विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे नियोजन करावे.
हेही वाचा – नागपूर : विदेशातून ‘गिफ्ट’चे आमिष; गृहिणीची फसवणूक
आवेदन पत्र भरण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना मुख्याध्यापकांना द्याव्या. सर्व परीक्षांची माहिती विभागीय स्थळावर कार्यशाळा घेवून यापूर्वीच देण्यात आली आहे. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय व राज्य परीक्षा परिषदेत सादर करण्याची सूचना आहे.