अमरावती : उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेअंतर्गत पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका या विभागाअंतर्गत १० तर डॉक्टरेट या विभागाअंतर्गत १० अशा एकूण २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी रविवार १३ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत आहे.
हेही वाचा – अमरावतीत एसटी महामंडळाचे ११ कर्मचारी निलंबित; कारण काय, जाणून घ्या…
शिष्यवृत्तीच्या एकूण जागांपैकी ३० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात येईल. २०२३-२०२४ या वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात असून अर्जासाठी १२ जुलै ही अंतिम मुदत होती. त्यात आता १३ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएचडी अभ्यासक्रमासाठी परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतला असेल, अशा विद्यार्थ्यांकरीता ही शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. उमेदवारांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.