नागपूर : विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जाणाऱ्या नागपूरच्या सरस्वती विद्यालयाच्या सहल बसला हिंगणा जवळ अपघात झाला होता. या प्रकरणाला परिवहन खात्याने गांभीर्याने घेतले आहे. आरटीओने अनधिकृत पीयूसी देणाऱ्या पीयूसी केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावत स्पष्टीकरणासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. परंतु, मुदतीनंतरही संबंधिताकडून स्पष्टीकरण आले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना सहलीच्या घेऊन निघालेल्या बसला हिंगणा परिसरात अपघात होऊन एक विद्यार्थिनीचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. अपघातानंतर या बसच्या मालकाने अनधिकृतरित्या अपघातग्रस्त बसची पीयूसी काढल्याचे उघड झाले. पूर्व नागपूर उपप्रादेशिक विभाग कार्यालयाने पीयूसी देणाऱ्या केंद्राला २८ नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसांच्या स्पष्टीकरणासाठी मुदत दिली होती.

हेही वाचा…सरकार स्थापनेपूर्वीच राज्यात कंत्राटी भरती?, काँग्रेसचा आरोप…

दरम्यान, मुदत संपल्यावरही बस मालकाकडून आरटीओकडे उत्तर आले नाही. त्यामुळे मंगळवारी या प्रकरणात संबंधित कार्यालयात पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात या केंद्राची नोंदणी रद्द होऊन तेथील पीयूसी केल्याचे दर्शवलेले यंत्रही जप्त होण्याची शक्यता आहे. या विषयावर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत म्हणाले, या प्रकरणात पीयूसी केंद्रासह सगळ्याच दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात प्रादेशिक परिवहन विभागाकडून दोषी पीयूसी केंद्र चालक आणि संबंधित अपघातग्रस्त बसच्या मालकावर काय कारवाई करणार ? याकडे सगळ्याच नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. तर या घटनेमुळे स्कूलबसच्या सुरक्षीततेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

घटना काय?

नागपुरातील शंकरनगर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस हिंगणा परिसरातून पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खाली कोसळली. या विचित्र अपघातात एक विद्यार्थीनी ठार झाली. तर बसमधील अनेक विद्यार्थी जखमी झाले. तातडीने या सगळ्याच विद्यार्थ्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा…धक्कादायक! नागपुरातील बर्डी उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली

तीन विद्यार्थ्यांसह शिक्षिकेवर शस्त्रक्रिया

हिंगण्यातील स्कूलबस अपघातातील सगळ्याच जखमींना तातडीने नागपुरातील अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या मुत्रपिंडाला इजा असल्याने आपत्कालीन स्थितीत त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया केली गेली. तर दोन विद्यार्थ्यांचे हाताचे हाड मोडल्याने त्यांच्यावरही इम्प्लांटचे राॅड टाकून शस्त्रक्रिया केली गेली. तर जखमी शिक्षीकेच्या मनक्यातील हाडावर फॅक्चर होते. तिच्यावरही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School bus accident case centers registration may be canceled and the puc machine could be confiscated mnb 82 sud 02