अकोला : शाळेत देखील आता विद्यार्थिनींसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोल्यातील एका शाळेतील कर्मचाऱ्यांची विद्यार्थिनींवर वाईट नजर पडली. त्यातून त्या नराधम कर्मचाऱ्याने तब्बल दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. हेमंत विठ्ठल चांदेकर (४३, रा. सनसिटी रेसिडेन्सी मलकापूर, अकोला) असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील कौलखेड परिसरात मॉ रेणूका मराठी शाळा आहे. या शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. शाळेची जबाबदारी एका पुरुष कर्मचाऱ्यावर देण्यात आली. शाळेत कोणी महिला शिक्षिका नसल्याचे पाहून आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. इयत्ता चौथी व इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या तब्बल दहा विद्यार्थिनींचा आरोपीने विनयभंग केला. शिक्षिका प्रशिक्षण झाल्यावर शाळेत परतल्यानंतर काही विद्यार्थिनींनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.
हा प्रकार कळताच शाळेतील शिक्षिकांना मोठा धक्का बसला. या प्रकाराची माहिती शाळेच्या संचालिका पल्लवी कुलकर्णी यांनी चाइल्ड हेल्पलाइनला दिली. कर्मचाऱ्याच्या गैरकृत्यामुळे त्याला शिक्षण संस्थाचालकांनी ८ मार्चपासून शाळेतून काढून टाकले. या प्रकरणाची चौकशी चाईल्ड हेल्पलाइनकडून करण्यात आली. त्यानंतर प्रकरणाची माहिती चाईल्ड हेल्पलाइनने जिल्हा प्रशासनातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय तसेच बालकल्याण समितीकडे सादर केली. बालकल्याण समितीने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश चाईल्ड हेल्पलाइनच्या हर्षाली गजभिये यांना दिले.
शाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणात आरोपीच्या विरोधात चाइल्ड हेल्पलाइन, तसेच जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या समन्वयक हर्षाली गजभिये यांनी खदान पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन खदान पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ८, ९ (एफ) (एम), पोक्सोचे कलम १०, तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०२५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला. खदान पोलिसांनी आरोपी हेमंत चांदेकर याला बेड्या ठोकून त्याला न्यायालयात हजर केले. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली. शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.