सेंदूरवाफा येथील अंगणवाडीतील गंभीर प्रकार
भंडारा : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे याकरिता शाळा आणि अंगणवाडीतून विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र मध्यान्ह भोजनात दिल्या जाणाऱ्या खिचडीत चक्क खडे आणि अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार सेंदुरवाफा येथील अंगणवाडीत घडला. एका पालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
साकोली शहरातील सेंदुरवाफा स्थित प्रभाग क्र. ४ च्या अंगणवाडी क्र. ६ मध्ये निकृष्ट दर्जाची खिचडी आणि मिसळ देण्यात आली. मध्यान्ह भोजनात दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मिसळमध्ये अळ्या आणि खडे आढळून आल्याचा आरोप प्रियंका डिकेश्वर मेश्राम यांनी केल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा >>> अवैध खनिज उत्खनन व वाहतूकबाबत जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन’ मोडवर
लक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून या अंगणवाडीत खिचडी बनवून त्याचे वाटप केले जाते. येथे काम करणाऱ्या महिला सहाय्यक रत्नमाला तर्जुले यांच्याकडे धान्य स्वच्छ करणे आणि स्वयंपाक करण्याची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळे मध्यान्ह भोजनात लहान मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न वाटप केले जात आहे. येथे कार्यरत अंगणवाडी शिक्षिका ज्योती परिहार आणि सहाय्यक सरोज तर्जुले या दोघी मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाची चाचणी न करता सरसकट वाटप करतात, अशी तक्रार पालकांनी केली आहे. या घटनेमुळे पालक वर्ग अत्यंत संतप्त आणि चिंतेत आहे. पालक वर्गाने आपली तक्रार अधिकारी आणि नगरसेवकाकडे केली आहे.
हेही वाचा >>> काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाकडे कानाडोळा, कार्यकर्त्यांना ‘तारीख पे तारीख’
मी वीस वर्षांपासून या अंगणवाडीत खिचडी बनवत आहे. आता माझ्या डोळ्यांनी नीट दिसत नाही त्यामुळे खिचडीमध्ये खडे आणि अळ्या राहून गेल्या असतील. या निष्काळजीपणाची मला लाज वाटते. भविष्यात काळजी घेईन. – रत्नमाला तर्जुले
मुलं नेहमी खिचडीबद्दल तक्रार करायचे. मुलाच्या टिफिनमध्ये खिचडी पाहिल्यावर त्यात अळ्या आणि खडे दिसले. याबाबत मी अंगणवाडी शिक्षिकेकडे तक्रार केली आहे. हा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. हे सुधारले पाहिजे. अन्यथा याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करू. –प्रियांका मेश्राम, पालक