अकोला : समाजमाध्यमांवर ‘रिल’ बनवून टाकण्यासह हौस पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन शाळकरी मुलांनी थेट शोरूममधून महागड्या गाड्या चोरल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी पोलीस तपासात उघडकीस आला आहे. या शाळकरी मुलांना पोलिसांनी चोरीच्या गाड्यांसह ताब्यात घेतले. अल्पवयीन मुले सधन कुटुंबातील आणि प्रतिष्ठित नामवंत शाळेतील आहेत. आरोपींमध्ये एक १८ वर्षाचा असून अन्य चार अल्पवयीन आहेत.
हेही वाचा >>> लाचखोर दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षकाला पोलीस कोठडी; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील फरार
एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिवणी परिसरात महिंद्रा कंपनीचे वाहन विक्री व दुरुस्ती केंद्र आहे. या शोरूममधून अल्पवयीन आरोपी महागड्या गाड्या चोरून शहरातील मुख्य मार्गावर चालवत होते. परिवहन विभागात नोंदणीकृत नसताना नवी कोरी कार रस्त्यावर कशी आली, असा प्रश्न पडल्यावर कंपनीच्या व्यवस्थापकांनी तातडीने चौकशी केली. चार ते पाच महागड्या नव्या गाड्या शोरूम मधून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ६ मे रोजी गाड्या चोरी गेल्याची तक्रार नोंदवली.
हेही वाचा >>> जमिनीच्या मोहापायी सख्ख्या भावाचा काढला काटा; भावासह दोन पुतणे गजाआड
पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी मिर्झा अबेद मिर्झा सईद बेग (रा. कलाल चाळ अकोला) यास व चार विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्यातील चोरीला गेलेल्या दोन महिंद्रा गाडी एक्सयूव्ही ७०० प्रत्येकी किंमत २६ लाखप्रमाणे ५२ लाख तसेच एक महिंद्रा स्कॉपिओ गाडी किंमत १७ लाख रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी प्रत्येकी किंमत ५० हजार रुपये. असा एकूण ७० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल तपासात जप्त केला. या गुन्हयात आणखीन वाहने मिळून येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केली. पाच पैकी एका आरोपीचे वय १८ वर्ष पूर्ण झालेले असल्याने त्याला न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. इतर चार अल्पवयीन आरोपींना बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.