अमरावती: दोन महिन्याच्या सुटीनंतर विदर्भात उद्या शुक्रवारी ३० जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुटीनंतर २०२३-२४ शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शाळांना शिक्षण विभागाकडून विविध सूचना देण्यात आल्या. शाळा ३० जूनपासून सुरू होतील, असे पूर्वीच सांगण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत, शाळांची स्वच्छता, सौंदर्यीकरण करायचे आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्यापूर्वीच पाठ्यपुस्तके, गणवेशांचे नियोजन केले आहे.
हेही वाचा… कशी आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना? कसे घडणार विद्यार्थी? जाणून घ्या एका क्लीकवर…
शुक्रवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळा सुरू होत असल्याने शहरातील स्टेशनरी दुकानांवर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूलबॅग, वॉटरबॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत होते. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्याने शालेय साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. बाजारपेठेमध्ये साहित्य खरेदीसाठी बच्चेकंपनीसह पालकांची गर्दी झाली होती. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह त्यांच्या पाल्यांची लगबग पहायला मिळाली.