भंडारा : राज्य शासनाने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २ मेपासून विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, असे असतानाही भंडारा शहरातील अनेक शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एकीकडे तापमानाचा पारा चढत असल्याने उष्माघाताचा धोका वाढलेला आहे, तर दुसरीकडे शाळा प्रशासन मात्र विद्यार्थ्यांना वेठीस धरून शाळेत येण्यास बाध्य करीत आहे. शिक्षण विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
नवीन शैक्षणिक सत्राबाबत शासन पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार, २ मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही ११ जूनपर्यंत असणार आहे, तर विदर्भातील उन्हाळा लक्षात घेता या भागातील नवे शैक्षणिक वर्ष हे २६ जूनपासून सुरू होणार आहे. २ मेपासून सुट्टी लागणार म्हणून विद्यार्थी आनंदी होते. पालकांनीही सुट्ट्यांचे वेगळे नियोजन केले होते. असे असताना जिल्हा परिषद वगळता इतर मंडळाच्या अनेक शाळा व्यवस्थापनाने स्वमर्जीने सुरूच ठेवल्या आहेत.
हेही वाचा – नागपूर : पती-पत्नीला दुकान सांभाळायला दिले, पण रोज जमा होणाऱ्या पैशांमुळे…
सध्या जिल्ह्यात ४३ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. सकाळी ८ वाजताच सूर्य आग ओकत असताना हे विद्यार्थी मात्र शाळेत जाताना दिसत आहेत. शाळेत दिवसभर विद्यार्थी उकाड्यात बसून असतात. शाळांमध्ये एसी, कुलर, अशा सुविधा नाहीतच. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. अभ्यासक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती करण्यात येते. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही. मुळात सुट्टीसंदर्भातील शासन परिपत्रकात स्पष्ट निर्देश असतानाही विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या शाळांमध्ये असे कोणते महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत, या शाळांमध्ये पालक-शिक्षक संघटना आहे, की नाही? सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना काहीही कमी-जास्त झाले तर त्याला जबाबदार कोण? शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक यांची भूमिका काय, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
याबाबत माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी सांगितले की, शासनाच्या परिपत्रकाचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. शासनाच्या दिशा निर्देशांचे पालन करणे गरजेचे असते. यावर शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक यांचे नियंत्रण असते. मग अशा स्वयंअर्थसहायित शाळा कुणाच्या आदेशाने सुरू आहेत, शिक्षण विभाग झोपेत आहे का, असे प्रश्न उपस्थित होतात. निव्वळ शुल्क वसुलीसाठी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात आहे. उष्माघाताची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता शाळांना सरसकट सुट्टी द्यायला हवी. शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणत्या अनुचित घटनेची वाट पाहत आहे का, सेवाशर्थी अधिनियमाचा भंग केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असे प्रश्नही उदापूरे यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा – भारतात प्रथमच नवीन ‘ग्रीन लिंक्स’ कोळी प्रजातीचा शोध….
यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवी सलामे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी दिवसभर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बैठकीत असल्याचे सांगून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.