विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी स्पर्धा
जगभरात २०१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने रामन विज्ञान केंद्रात पांडव ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स नागपूर आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ऑरेंज सिटी विज्ञान मेळावा येत्या २१ ते २३ डिसेंबपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अनुक्रमे चलित विज्ञान प्रदर्शन स्पर्धा व शिक्षण सामग्री प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित अथवा आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष एरोनॉटिक्स, रॉकेट विज्ञान, रोबोटिक्स या विषयातील कोणत्याही एका सिद्धांतावर आधारित प्रतिकृती किंवा प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली ते प्रदर्शित करू शकतील. शिक्षकसुद्धा त्यांनी तयार केलेली शिक्षण सामग्री तीन दिवसांकरिता रामन विज्ञान केंद्रात प्रदर्शित करू शकतील.
मॉडेलचा आकार तीन बाय दोन फूटपेक्षा अधिक नसावा. सहभागी विद्यार्थ्यांना तिन्ही दिवसांकरिता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांच्या प्रतिकृतींसोबत थांबून येणाऱ्या दर्शकांना प्रात्यक्षिक करून दाखवणे अनिवार्य आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी भेट हा कार्यक्रम २१ तारखेला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून, यात इयत्ता सातवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष या विषयांच्या शंकांचे निरसन शास्त्रज्ञ व तज्ज्ञ मार्गदर्शक करतील. विज्ञान प्रश्न मंजुषा इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या वयोगटांसाठी दि. २१ डिसेंबरला दुपारी एक वाजता होईल. यात अनुक्रमे सामान्य विज्ञान आणि प्रकाश या विषयावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. खुली प्रायोगिक विज्ञान प्रश्न मंजुषा वर्ग सात ते बारा वयोगटांसाठी २३ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता होईल. यात विज्ञानाचे विविध प्रयोग दाखवण्यात येतील व या प्रयोगांवर आधारित प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक रामदास अय्यर यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी विज्ञान मेळाव्यात अधिकाधिक संख्येने भाग घेण्याचे व विज्ञान प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले आहे.
स्पध्रेत भाग घेण्यासाठी व नाव नोंदणीसाठी किंवा प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी ०७१२-२७३५८०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.