‘सीएसआयआर’चा स्थापना दिवस साजरा
निसर्गात घडणाऱ्या घटना समजणे हे वैज्ञानिकांपुढील मोठे आव्हान आहे. अशावेळी मानवी हितासाठी या घटनांमागील रहस्य उलगडण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. वैज्ञानिक सृष्टीचा शोध लावण्यात यशस्वी झाल्यास ती मोठी उपलब्धी ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी केले.
‘सीएसआयआर’चा स्थापना दिवस राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेद्वारे ‘नीरी’च्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला सीएसआयआर नीरीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. तपस नंदी आणि नीरीच्या अनुसंधान व विकास योजना प्रभागाचे प्रमुख प्रकाश कुंभारे व्यासपीठावर होते. यासंदर्भात पुढे बोलताना डॉ. काणे म्हणाले, अविष्कृत विज्ञानामुळे विविध वैज्ञानिक व तंत्रज्ञान विकासामुळे होणाऱ्या पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात मदत मिळेल. वर्तमानकाळात विकास आणि पर्यावरण संतुलन कायम राखण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणावर प्रतिकुल परिणाम होणार नाही, यादृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग सांभाळून करा. विविध उत्पादन प्रक्रियांमुळे पर्यावरणात प्रदूषण होत आहे. त्यावर उपाय शोधण्याचे आवाहन त्यांनी वैज्ञानिकांनी केले. शिक्षण प्रणालीत नेहमी गुरू आणि शिष्यांचे नाते आवश्यक आहे, पण अलीकडच्या काळात ते ग्राहक आणि सेवा पुरवठादार या नात्यात परिवर्तन होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. तपस नंदी यांनी सीएसआयआरविषयी माहिती दिली. विज्ञाानाच्या विविध विषयातील संशोधन व विकासाच्या लक्ष्याची माहिती त्यांनी दिली. एकता आणि विविधतेचा सीएसआयआर हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या संस्थेने देशाकरिता सुप्रसिद्ध वैज्ञानिक दिले. देशाला आज खऱ्या अर्थाने गरज असलेल्या संशोधन व विकासाच्या गतिविधींना वैज्ञानिकांनी कार्यान्वित करावे, असे डॉ. नंदी म्हणाले.
याप्रसंगी सामान्य जनतेकरिता नीरी खुले ठेवण्यात आले होते. यावेळी शहरातील १६ शाळांमधील सुमारे ८५० विद्यार्थ्यांनी नीरीला भेट दिली. याप्रसंगी विज्ञान मॉडेल प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली. रामण विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक एन. रामदास अय्यर यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. इयत्ता आठवी ते दहावी या पहिल्या गटात सांदीपनी स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला प्रथम पुरस्कार, ईरा इंटरनॅशनल शाळेला द्वितीय पुरस्कार आणि न्यू अपोस्टोलिक इंग्लिश हायस्कूलला तृतीय पुरस्कार देण्यात आला. नारायणा विद्यालयाला प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. अकरावी ते बारावी या दुसऱ्या गटात टाटा पारसी कनिष्ठ महाविद्यालयाला प्रथम आणि द्वितीय पुरस्कार देण्यात आले. ईरा इंटरनॅशनल स्कूलला तृतीय पुरस्कार देण्यात आला.
सीएसआयआरमध्ये २५ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अलीकडेच सेवानिवृत्त दिलेल्या सीएसआयआर-नीरीच्या कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. २०१५ मध्ये सीबीएसई परीक्षेत विज्ञानाच्या तीन विषयात ९० टक्क्यांहून अधिक अंक प्राप्त केल्याबद्दल विमल कुमार यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.