नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातून आतापर्यंत अनेक वाघांनी स्थलांतर केले. केवळ स्थलांतरच नाही तर लांब अंतराच्या स्थलांतरणामुळे त्याचे ‘रेकॉर्ड’ देखील नोंदवले गेले. याच अभयारण्यात काहीही दोष नसताना १४ माणसाच्या मृत्यूचा ठपका ठेवून ‘अवनी’ या वाघिणीला ठार करण्यात आले. आता याच अभयारण्याने आणखी एक नवी नोंद केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात पहिल्यांदाच रानगव्याची वैज्ञानिक नोंद करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षात या व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढली. त्यानंतर आता पहिल्यांदाच रानगव्याची नोंद या अभयारण्यात करण्यात आली. नागपुरपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावरील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. टिपेश्वरला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला, त्यावेळी वाघांची संख्या थोडीथोडकीच होती. मात्र, उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे या अभयारण्यात अलीकडच्या काही वर्षात वाघांची संख्या चांगलीच वाढली. तुलनेने अधिवास कमी पडत असल्याने वाघ येथून स्थलांतर करत असल्याचे देखील समोर आले आहे. आता रानगव्याच्या नोंदीने पुन्हा एकदा हे अभयारण्य चर्चेत आले आहे. टिपेश्वरमध्ये वैज्ञानिकरित्या पहिल्यांदाच रानगव्याची नोंद करण्यात आली. यापूर्वी १९८५ मध्ये व त्यानंतर २००२-०३ मध्ये रानगवा दिसल्याची चर्चा होती.
मात्र, त्याची कोणतीही वैज्ञानिक नोंद झाली नाही किंवा त्याचे छायाचित्रदेखील मिळाले नाही. मे २०२० मध्ये करोनाकाळात खुनी नदीजवळील डोंगरगावच्या शेतात रानगवासदृश्य प्राणी दिसला, पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. ११ एप्रिलला टिपेश्वर अभयारण्याच्या कक्ष क्र. ११० मध्ये काही पर्यटकांनी रानगवा पाहिल्याचे सांगितले. त्याचे छायाचित्र घेण्यात देखील यश आले. दरम्यान, हा रानगवा महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प किंवा तेलंगणातील कावल व्याघ्रप्रकल्पातून आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कारण यापूर्वी वाघांमुळे या दोन्ही व्याघ्रप्रकल्पाचा संबंध टिपेश्वर अभयारण्यासोबत आला आहे. त्यामुळे त्याच कॉरिडॉरचा वापर रानगव्याने केला असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
उत्कृष्ट व्यवस्थापन
गेल्या काही वर्षात व्याघ्रसंवर्धनाच्या अनुषंगाने टिपेश्वर अभयारण्यात उत्कृष्ट व्यवस्थापन दिसून येत आहे. विशेषकरुन गवती कुरणे आणि पाण्याच्या व्यवस्थापनात या अभयारण्यात चांगले काम होत आहे. वन्यप्राणी अशाच चांगल्या अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात. त्यामुळे टिपेश्वर अभयाण्याच्या दृष्टीने ही एक चांगली उपलब्धी आहे.