लोकसत्ता टीम
नागपूर: इच्छाशक्तीला परिश्रमाची जोड असेल तर स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येतात हे एका शेतकरी कुटूंबातील मुलाने करून दाखवले आहे. आई निरक्षर तर वडील केवळ तीसरी उत्तीर्ण आहेत. परंतु, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी संशोधन करण्याच्या ध्येयाने राहुल डमाळे यांना शांत बसू दिले नाही. त्यांची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारे दरवर्षी परदेशात पीएच.डी. उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘नेताजी सुभाष आयसीएआर इंटरनॅशनल फेलोशिप’ दिली जाते. या फेलोशिप अंतर्गत संपूर्ण भारतातून वीस उमेदवारांना परदेशात पाठवले जाते. परदेशातील दहा उमेदवारांना भारतात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. या फेलोशिपकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता एम.एस्सी. इन ॲग्रिकल्चरल सायन्स, एम.एस्सी. इन सायन्स, तसेच सहाय्यक प्राध्यापक व शास्त्रज्ञ पात्र आहेत.
आणखी वाचा-वाघिणीच्या दोन बछड्यांचा मृत्यू, एकाचा जीवनमरणाचा संघर्ष…
परदेशात उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन भारताचा कृषी क्षेत्रात सर्वांगीण विकास कसा करता येईल, या संकल्पनेतून ही फेलोशिप दिली जाते. दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार बारा उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. त्यामधून तीन उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे. यामध्ये राहुल देविदास डमाळे, शास्त्रज्ञ (वनस्पती जैव रसायनशास्त्र) आयसीएआर-राष्टीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली) यांची निवड करण्यात आली. या यशासाठी राष्टीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ. राजीव मराठे यांचे अगणित व मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
आणखी वाचा-एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
राहुल डमाळे हे मूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड या गावचे आहेत. तसेच, त्यांचे प्राथमिक शिक्षण डमाळे वस्ती जिल्हा परिषद शाळा पालखेड, माध्यमिक शिक्षण श्री. पारेश्वर विद्यालय पालखेड शाळेमधून झाले आहे. तसेच बी. एसस्सी. अग्रिकल्चर बायोटेक्नॉलजी एमजीएम महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे झाले. तर एम.एस्सी. वनस्पती जैव रसायनशास्त्र भारतीय कृषी अनुसंधान संस्थान नवी दिल्ली संस्थानमधून पूर्ण केले आहे. राहुलचे आई-वडील शेतकरी असून वडिलांचे इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झाले. तर आई निरक्षर आहेत. राहुल यांचे जन्मतः शेतीशी नाळ जुळली होती. त्यामुळे त्यांनी कृषी क्षेत्रात करिअर करून देशामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याला प्राधान्य दिले. राहुल डमाळे यांची निवड युनिव्हर्सिटी ऑफ घेन्ट बेल्जियम या विद्यापीठात झाली आहे. त्यांचे पुढील शिक्षण अधिष्ठाता आणि प्रपाठक इला व्ही. धम्मे यांच्या मार्गदर्शना अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्रि आणि ग्लायकोबायोलॉजी लॅबमध्ये पूर्ण केले जाईल. या यशाबद्दल राहूल यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.