नागपूर : एका व्याघ्रप्रकल्पातून दुसऱ्या व्याघ्रप्रकल्पात जाण्यासाठी वाघ मध्यभारतातील प्रदेश (लँडस्केप) ओलांडत मोठे अंतर पार करतात. एका व्याघ्रप्रकल्पात जन्मलेले वाघ इतर व्याघ्रप्रकल्पात जातात आणि तिथल्या वाघांसोबत त्यांचे प्रजनन होते. वाघांच्या अधिवासातील ही निरोगी अनुवंशिक देवाणघेवाण व्याघ्रसंचारमार्गामुळे अधिक सुलभ होते. रस्ते पर्यावरण या विषयावरील प्रदीर्घ अभ्यासानंतर शास्त्रज्ञ व वन्यजीव तज्ज्ञांनी मध्य भारतातील लँडस्केपमध्ये वाघांच्या कॉरिडॉरवर एकमत प्रस्थापित केले आहे.
नेटवर्क फॉर कॉन्झर्विग सेंट्रल इंडियाने (एनसीसीआय) केलेला हा अभ्यास ‘कॉन्झर्वेशन बायोलॉजी’मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. व्याघ्र संचारमार्ग संलग्न क्षेत्रावर हा अभ्यास आहे. देशातील वाघांच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश वाघ मध्य भारतातील लँडस्केपमध्ये आहेत. याठिकाणी वाघांच्या हालचालीची उच्च क्षमता असण्यावर अभ्यासकांनी सहमती दर्शवली आहे. गेल्या दशकात व्याघ्र संवर्धन आणि रस्ते संलग्नता यावर व्यापक लक्ष केंद्रीत केल्यामुळे भारतात वाघांसाठी प्रभावी संवर्धन योजना तयार झाल्या आहेत. आधी केवळ संरक्षित क्षेत्रावरच लक्ष केंद्रीत होते, पण आता विस्तीर्ण लँडस्केप आणि त्यावरील वाघांसह इतरही वन्यप्राण्यांची उपस्थिती यावरही लक्ष केंद्रीत केले जात आहे. मध्य भारतातील या लँडस्केपमध्ये नैसर्गिक जनुकांचा प्रवाह अधिक सुलभ करण्यासाठी या योजना वन्यजीव कॉरिडॉरच्या महत्त्वावर अधिकाधिक भर देतात. या अभ्यासातील लेखकांना असे आढळून आले आहे की, व्याघ्र संचारमार्ग संलग्न क्षेत्रात जमिनीची मालकी गुंतागुंतीची आहे. विशेषत: ७० टक्के व्याघ्र संचारमार्गाचे संलग्न क्षेत्र हे गावाच्या प्रशासकीय हद्दीत येतात. १०० टक्के आच्छादित वनविभागाच्या व्यवस्थापन सीमेत आणि एकूण व्याघ्र संचारमार्ग संलग्न क्षेत्राच्या १६ टक्के क्षेत्र रेषीय पायाभूत सुविधांच्या एक किलोमीटरच्या आत येतात. वाघांच्या संचारमार्गाची संलग्नता टिकवून ठेवण्यासाठी वन्यजीवांचे सुरक्षित मार्ग, स्थानिक समुदायांच्या जीवनावश्यक गरजा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी संभाव्य स्पर्धात्मक उद्दीष्टे यांच्यातील योग्य संतुलनावर एकमत असणे आवश्यक असल्याचे मत या व्यवस्थापन परिणाम विश्लेषणाचे नेतृत्त्व करणाऱ्या डॉ. अमृता नीलकांतन यांनी व्यक्त केले आहे.
रस्ते पर्यावरण हा नवीन विषय असल्याने पर्यावरणीय निकषांबाबत वन्यजीव शास्त्रज्ञांचे एकमत होणे आवश्यक आहे. त्यासाठी मेळघाट येथे २०१९ रोजी झालेल्या परिषदेत एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ व भारतीय वन्यजीव संस्थेचे तज्ज्ञ एकत्र आले. त्यांच्यात व्याघ्र संचारमार्गाबाबत काही महत्त्वपूर्ण निकषांवर चर्चा होऊन एकमत झाले. ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. यावर आधारित हा शोधनिबंध रस्ते विकास व वन्यजीव संवर्धन या क्लिष्ट विषयात मार्गदर्शन करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. -किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा