शफी पठाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन दिवसांच्या नियोजित कार्यक्रमात गज्वींच्या नाटय़कृतींवर चर्चाही नाही

नाटय़ संमेलनात संमेलनाध्यक्षांच्या प्रकट मुलाखतींचा मोठा इतिहास आहे. नेमाने झालेल्या व गाजलेल्या या मुलाखतींनी नाटय़ क्षेत्राला नेहमीच एक दिशा व विचार दिला आहे. नागपुरात आयोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड झाल्याने प्रयोगशील नाटय़कर्मी व रसिकांमध्ये त्यांच्या मुलाखतीबाबत विशेष उत्सुकता होती. परंतु आयोजकांनी संमेलनाआधीच अध्यक्षांच्या मुलाखतीवर ‘पडदा’ टाकला आहे. मंगळवारी मुंबईत नाटय़ परिषदेच्या कार्यालयात जाहीर झालेल्या संमेलनाच्या तीन दिवसीय कार्यक्रमात संमेलनाध्यक्षांच्या प्रकट मुलाखतीचा कुठेच उल्लेख नाही.

नाटय़ संमेलनाच्या उद्घाटनीय व समारोपीय सत्रात मान्यवरांच्या गर्दीमुळे  संमेलनाध्यक्षांना आपले विचार पूर्ण क्षमतेने मांडता येत नाहीत. परिणामी, त्यांचे छापील भाषण वाटले जाते, परंतु ते सर्वांपर्यंत पोहोचेलच याची खात्री नसते. त्यावर उपाय म्हणून संमेलनाध्यक्षांची स्वतंत्र प्रकट मुलाखत घेण्याचे संकेत आहेत. सांगली येथे झालेल्या ९२ व्या नाटय़ संमेलनात संमेलनाध्यक्ष श्रीकांत मोघे, बेळगावी झालेल्या ९५व्या नाटय़ संमेलनात  फैय्याज, ठाण्यात झालेल्या ९६व्या नाटय़ संमेलनात गंगाराम गवाणकर, उस्मानाबादमध्ये झालेल्या ९७व्या नाटय़ संमेलनात जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत झाली व गाजलीही.  नाटय़ संमेलनाध्यक्षांच्या मुलाखतीचे हे संकेत नागपुरात पाळले जातील, अशी अनेक नाटय़प्रेमींची अपेक्षा होती, परंतु आयोजकांनी ही अपेक्षाच फोल ठरवली आहे. ठाण्यातील ९६व्या नाटय़ संमेलनात गंगाराम गवाणकर यांचे ‘चित्रांगदा’ हे नाटक सादर झाले होते. हा संकेतही यंदा मोडण्यात आला आहे. ६० तासांच्या या मॅराथॉन संमेलनात  घोटभर पाणी, तनमाजोरी, किरवंत अशी वेगळ्या धाटणीची नाटके लिहिणाऱ्या गज्वींच्या नाटय़कृतीवर एकही सत्र कसे नाही, यावरही रंगकर्मीनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मी संमेलनाचा नियोजित अध्यक्ष आहे. अद्याप मी संमेलनाध्यक्षाची सुत्रे स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे आयोजकांच्या निर्णयात हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. तसाही संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा कालावधी मला मिळणारच आहे. तेव्हा मी माझी भूमिका सविस्तरपणे मांडेलच.

-प्रेमानंद गज्वी, संमेलनाध्यक्ष, ९९ वे अ. भा. मराठी नाटय़ संमेलन

नाटय़ संमेलनात संमेलनाध्यक्षांची मुलाखत व्हायलाच हवी, अशी काही परंपरा नाही. त्यामुळे मुलाखत न ठेवण्यामागे काही विशेष हेतू असण्याचे कारण नाही. उद्घाटनीय व समारोपीय सत्रात संमेलनाध्यक्ष आपले विचार मांडणारच आहेत.

-प्रसाद कांबळी, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाटय परिषद