नवीन आठ रुग्ण आढळले

नागपूरसह पूर्व विदर्भात स्क्रब टायफसचे रुग्ण वाढतच आहे. गेल्या चौदा दिवसांमध्ये येथे या आजाराचे नवीन आठ रुग्ण आढळले असून त्यातील उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. यामुळे नागपूरच्या विविध रुग्णालयांत आजपर्यंत या आजाराने दगावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.

नामदेव बी. जांगडे (५१) रा. मौदा, जि. नागपूर, चंद्रकला छोटेलाल नेवारे (३५) आणि इतर एक आदींचा त्यात समावेश आहे. त्यांना स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यावर प्रथम जवळच्या रुग्णालयात व त्यानंतर त्रास वाढल्यावर उपराजधानीतील मेडिकल किंवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या तपासणी अहवालात त्यांना स्क्रब टायफस असल्याचे निदान झाले होते. या मृत्यूमुळे पूर्व विदर्भातील विविध रुग्णालयांत आजपर्यंत या आजाराच्या रुग्णांची संख्या १९४ वर पोहोचली असून त्यातील दगावणाऱ्यांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. सर्वाधिक ८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्य़ातील आहे. नागपूर शहरातही या आजाराचे ४० रुग्ण आढळले असून त्यातील ६ रुग्ण दगावले आहेत. सातत्याने रुग्ण आढळत असल्यामुळे मेडिकल, मेयोत या रुग्णांसाठी स्वतंत्र उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. उंदरावर आढळणाऱ्या पिसव्यांपासून हा आजार होतो.  पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत सध्या या पिसव्यांवर अभ्यास सुरू असून त्यांच्यात स्क्रब टायफसला कारणीभूत गुणधर्मही आढळले आहेत, हे विशेष.

सात दिवसांत डेंग्यूचे ३९ रुग्ण

पूर्व विदर्भात १ ते ७ नोव्हेंबर २०१८ दरम्यान डेंग्यूचे नवीन ३९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक २२ रुग्ण हे केवळ नागपूर शहरातील आहेत. या काळात वर्धा जिल्ह्य़ात- ४, गोंदियात ४, चंद्रपूर (ग्रा.) ३, चंद्रपूर शहर- ३, गडचिरोलीत २ रुग्ण रुग्ण आढळले आहेत, तर गेल्या पाच महिन्यात नागपूर ग्रामीणमध्ये या आजाराने दोघांचा तर वर्धा जिल्ह्य़ात ५ जणांचा मृत्यू झाला आहे.