पूर्वी गणपतीच्या कलात्मक मूर्तींसाठी चितारओळ ओळखली जायची. मात्र गेल्या काही वर्षात येथील मूर्तीमधील कलात्मकता कमी झाली असून मूर्तिकारांमध्ये व्यावसायिकता वाढली आहे. मुंबई – पुण्याचे अनुकरण करत मोठ्या मूर्ती तयार करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झाली आहे, अशी खंत ज्येष्ठ शिल्पकार व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> गोंदिया : आमदार विनोद अग्रवाल यांनी महावितरण अभियंत्याच्या कानशिलात लगावली
लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. पडोळे म्हणाले, गेल्या काही वर्षात बाहेरील मूर्तिकारांनी तयार केलेल्या गणपतीच्या मूर्ती आपल्याकडे येऊ लागल्या आहेत. त्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असतात. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कलात्मक दृष्टी लाभलेले पारंपरिक मूर्तिकार असताना आपण शहराला लागेल एवढ्या गणपतीच्या मूर्ती का तयार करू शकत नाही? मुंबई-पुणे किंवा कोकणात वर्षभर गणपतीची मूर्ती तयार करणारे कारखाने चालतात. मात्र आपण उत्सव आला की मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतो. आपल्याकडे गणपतीच्या मूर्तीचा आकार वाढला. मात्र त्यात कलात्मकता कुठेच दिसून येेत नाही. आपल्या मूर्तिकारांनी बाराही महिने मूर्ती घडवायला हव्या. पण, त्यांच्याकडे ती जिद्द नाही, असेही पडोळे म्हणाले.
हेही वाचा >>> गडचिरोली : पैशाच्या वादातून वडिलाने घेतला मुलाचा जीव; गोळी झाडून केली हत्या
सध्या चितारओळीत पारंपरिक मूर्तिकारांची संख्या कमी झाली आहे. बाहेरील अनेक मूर्तिकार गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी जागा घेऊन दुकाने थाटतात. त्यामुळे तेथील वर्षानुवर्षे राहणाऱ्या मूर्तिकारांना जागा मिळत नाही. शहरातील काही ठराविक भागात गणपती बघण्यासाठी लोकांची गर्दी राहत होती. विशेषत: मॉडेल मिल, कॉटेन मार्केट येथील गणेशोत्सवाला गर्दी असायची. मॉडेल मिलचा गणपती बंद झाला आहे. भोसले घराण्यातील गणेशोत्सवाला पूर्वी एक परंपरा होती. ती आजही टिकून आहे.
भोसले घराण्यातील गणपती हा चितारओळीत तयार केला जात होता. आजही केला जातो. पूर्वी पौराणिक कथांवर गणेश उत्सवात देखावे तयार केले जात होते. आता देखावे कमी झाले. आता वेगवेगळ्या मंदिराच्या किंवा राजे राजवाड्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत.