बुलढाणा: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या व २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचा तपास खामगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी मार्गावर होणाऱ्या अपघाताना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित ५ पोलीस ठाण्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

बुलढाणा स्थित पोलीस मुख्यालयात आज दुपारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही महत्वपूर्ण दिली. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षकद्वय बी. बी. महामुनी, अशोक थोरात हजर होते. पोलीस अधीक्षकांच्या वतीने यापूर्वी पोलीस, परिवहन,जिल्हा सरकारी वकील, ‘समृद्धी’शी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी ‘समृद्धी’च्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आल्याचे कडासने यांनी पत्र परिषदेत सांगितले.

हेही वाचा… सावधान! ४० दिवसांत दुप्पट पैशांचे आमिष; बोरा बॅण्ड ऑनलाइन ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणुकीचे प्रलोभन, काय आहे प्रकरण?

यावेळी कडासने म्हणाले की, घटनेचे गांभीर्य व गुंतागुंत लक्षात घेता, तपास खामगाव चे ‘एसडीपीओ’ प्रदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा त्यांनी बोलून दाखविला. आजच्या बैठकीत समृद्धी मार्गाशी संबंधित जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्याची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत परिवहन, समृद्धी शी संबधित अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणेदारांच्या अध्यक्षतेखालील ही समिती समन्वयाने जिल्ह्यातील अपघातांची कारणमीमांसा करून आपला अहवाल सादर करणार आहे.

अपघाताची कारणे व उपाय

या मार्गावरील अपघातांचे विश्लेषण केले असता, जास्तीत जास्त अपघात कारचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच बहुतेक अपघात मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेदरम्यान झाले आहे. कारच्या तुलनेत ट्रॅव्हल्स व ट्रक अपघातांची संख्या कमी आहे. महामार्ग संमोहन हा देखील कळीचा मुद्दा आहे. अपघातासाठी चालकाला लागलेली डुलकी, अपुरी झोप हे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या मार्गावर ठराविक अंतराने ‘रिफ्रेशमेन्ट सेंटर’ असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या मार्गावरील प्रवास आनंददायी ठरावा, असे नियोजन आहे. त्यादृष्टीने मार्गाच्या प्रारंभी व ‘इंटरचेंज’ च्या ठिकाणी चालकांचे समुपदेशन करण्यावर भर राहणार आहे. तसेच मार्गावर सूचना फलक लावण्यात येईल.जिल्ह्यातून जाणाऱ्या ८७ किलोमीटर च्या समृद्धी मार्गावर किमान अपघात व्हावे असे आमचा संयुक्त प्रयत्न राहील असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

४७ वाहनांवर कारवाई

मागील मे व जून महिन्यात समृद्धी वर १०७ वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे ‘एआरटीओ’ प्रसाद गाजरे यांनी यावेळी सांगितले. तसेच ४७ गुन्हे दाखल करण्यात आले. मागील फेब्रुवारीपासून परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांना समृद्धी वर जाण्याची मुभा देण्यात आली. विभागाची ८ वाहने मार्गावर गस्त घालतात. ‘समृद्धी’च्या डाव्या मार्गिकेने (लेन) जड वाहने तर मधल्या मार्गावर कार व बसला प्रवासाची मुभा आहे. दुभाजकाला लागून असलेली मार्गिका फक्त वाहन’ ओव्हरटेक’ करण्यासाठी असल्याची माहितीही गाजरे यांनी दिली.

Story img Loader