पाण्याच्या लाटांवर मोटारबोट आणि होडय़ाच तरंगताना आजवर पाहिलेल्या लोकांनी तब्बल १८ महिन्यांपूर्वी अॅम्फिबियन विमान उतरताना पाहिले, तेव्हा आपण एक स्वप्न पाहात आहोत, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. हा प्रकार शहरातच नव्हे तर एका तालुकास्तरावरच्या गावात घडल्याने या घटनेचे औत्सुक्य अधिकच होते. त्यानंतर मात्र काहीच हालचाली झाल्या नाहीत, तेव्हा ते स्वप्नच असावे, असे गृहीत धरून गावकरी ही घटना विसरूनही गेले. बऱ्याच आडकाठीनंतर पुन्हा आता त्या स्वप्नांचा पाठलाग सुरू झाल्याने हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात पुन्हा चाचणीसाठी खिंडसी जलाशयात ‘सी प्लेन’ची वारी होण्याची शक्यता आहे.
मुंबईत ऑगस्ट २०१४ मध्ये मेहेर (मेरिटाइम एनर्जी हेली एअर सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) कंपनीची ‘सी प्लेन’ सेवा सुरू झाली. राजधानीत ही सेवा सुरू करण्यास रामटेकचे माजी आमदार आशीष जयस्वाल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे मेहेर कंपनीने जयस्वाल यांना त्यांच्या क्षेत्रात ही सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाच्या पूर्तीच्या दिशेने नोव्हेंबर २०१४ मध्ये पहिले पाऊल त्यांनी उचलले. खिंडसीच्या जलाशयावर उतरलेल्या ‘सी प्लेन’चे सारथ्य एका महिलेने केले, तेव्हा सारेच अवाक् झाले. अनुभवी कॅप्टन प्रियंका मनुजा हिने ‘सी प्लेन’चे सारथ्य केले होते. कॅप्टन राहुल आणि कॅप्टन गौरव हे सहवैमानिक होते. तब्बल अर्धा तास खिंडसी जलाशयावर आणि १५ मिनिटांत पेंचमधील नवेगाव खरी जलाशयावर ते उतरले तेव्हा टेकडय़ांनी वेढलेल्या या जलाशयाच्या काठावर जमलेल्या गावकऱ्यांनी जल्लोष केला. त्याचवेळी विदर्भातील पर्यटन जागतिकस्तरावर पोहोचवण्यासाठी खिंडसी जलाशयातील ‘सी प्लेन’ सेवा ‘गेमचेंजर’ ठरणार हे निश्चित झाले होते. मात्र, रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी मच्छिमारांचा आश्रय घेत या प्रकल्पात खोडा घालण्याचा बराच प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आशीष जयस्वाल यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनही या प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळाली आहे.
जानेवारी २०१६ मध्येच नागपुरात कार्यालय सुरू करण्याचा मानस मेहेर कंपनीचे संचालक सिद्धार्थ वर्मा यांनी ‘लोकसत्ता’शी केलेल्या चर्चेत बोलून दाखवला होता. प्रकल्पातील अडथळ्यांमुळे ते सुरू होऊ शकले नाही, पण या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर होत प्रकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने पुन्हा एकदा सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा