नागपूर : मोक्काचा आरोपी कुख्यात सुमीत ठाकूरने जीवे मारण्याची धमकी देऊन जीम संचालकाला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सुमीतचा शोध पोलीस घेत आहेत.
सुमीत ठाकूर (३८) रा. फ्रेंड्स कॉलनी हा गुंडाची टोळी चालवितो. धमकी देत लोकांकडून वसुली करतो. त्याने गिट्टीखदानशिवाय इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध स्वरुपाचे गुन्हे केले. अलिकडेच जरीपटका पोलीस ठाण्याअंतर्गत एका युवकाला पिस्तुलचा धाक दाखवून अपहरण करून लुटमार केली. त्याच्यावर खून, खंडणी, मारहाण अशा गंभीर स्वरुपाची जवळपास २० गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्यावर मोक्काची कारवाई झाली आहे. तरीही तो गुन्हेगारीत सक्रीय होता. गोरेवाडा जुनी वस्ती येथील रहिवासी फिर्यादी गणेश उर्फ गुही चाचेरकर यांचा जीम आहे. सुसज्ज आणि अत्याधुनिक यंत्र सामग्री असल्याने जीममध्ये येणाऱ्या युवकांची संख्या भरपूर आहे. गणेशच्या जीमवर सुमीतची नजर गेली. १ नोव्हेंबरला गणेश गोरेवाडा फॉरेस्ट गेटजवळ असताना आरोपी सुमीत त्या ठिकाणी पोहोचला. त्याने गणेशला ५० हजार रुपये खंडणी मागितली. गणेशने नकार दिला. ‘तू मला ओळखत नाही काय? खंडणी तर द्यावीच लागेल नाहीतर खून करण्यात येईल’ अशी धमकी दिली.
हेही वाचा – नागपूर : चांगल्या आरोग्यासाठी दाम्पत्याने घरात मांडली पूजा, मग भोंदूबाबाने केले असे की…
हेही वाचा – नागपूर : गँगस्टर तिरूपती भोगेला अटक
भयभीत झालेला गणेश घरी गेला. पैशाची जुळवा जुळव केली आणि त्याला ५० हजार रुपये रोख दिली. यापुढे प्रत्येक महिण्याला खंडणी द्यायची असा दमही दिला. गणेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुमित विरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे. गिट्टीखदानशिवाय गुन्हे शाखा आणि इतरही पोलीस ठाण्याचे पथक सुमितचा शोध घेत आहेत. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांना सुमितने क्रिकेट सट्टेबाजीची लत लावल्यामुळे त्याला पोलिसांच्या प्रत्येक हालचालींची माहिती मिळते. त्यामुळे तो पोलिसांनी नेहमी गुंगारा देत असतो.