गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील बारापेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला पकडण्यासाठी ताडोबाहून विशेष पथक देसाईगंज वनपरिक्षेत्रात दाखल झाले आहे. सध्या हा नरभक्षी वाघ उसेगाव कोंढाळा परिक्षेत्रात असल्याने या भागातील नागरिक दहशतीत आहे.

हेही… नागपूर : विष्णू मनोहर तयार करीत आहेत अडीच हजार किलोचा महाप्रसाद ; फडणवीसांनीही लावला हातभार

हेही वाचा… नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले विविध मंडळांच्या गणेशाचे दर्शन

दोन वर्षांपासून उत्तर गडचिरोलीत वाघाची संख्या वाढल्याने ३० पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. अधूनमधून वाघाचे हल्ले होतच असतात. त्यामुळे या भागात कायम वाघाची दहशत पहायला मिळते. मात्र, काही महिन्यांपासून सीटी १ या वाघाने देसाईगंज वनविभागात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वाघाने चिमूर, देसाईगंज आणि लाखांदूर परिसरातील ७ नागरिकांचा बळी घेतला आहे. परंतु ही संख्या बारापेक्षा अधिक असल्याचे या भागातील नागरिक सांगतात. त्यामुळे या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बचाव पथकाला पाचारण केले आहे. चमूने सोमवारपासून शोधमोहीम सुरू केली आहे. यापूर्वीही याच पथकाने प्रयत्न केले होते. मात्र, यश आले नव्हते त्यामुळे आतातरी वाघाला जेरबंद करण्यात यश मिळणार काय याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader