वर्धा : शिक्षकी पेशासाठी अनिवार्य असणाऱ्या डीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकडे राज्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याची थक्क करणारी आकडेवारी आहे. राज्यात डीएड अभ्यासक्रमासाठी सर्व माध्यमाच्या ३१ हजार १०७ जागा आहेत. मात्र त्यासाठी केवळ १३ हजार ७९९ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया राबविल्या जात असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे. ७ जुलैला ‘चेकलिस्ट’ लागत आहे. ११ जुलैला पहिली प्रवेश यादी जाहीर होणार. अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रवेश मिळणार, हे निश्चित. शिक्षक होण्याची ईच्छा ठेवणाऱ्या प्रत्येकास डीएड किंवा बीएड आवश्यक असते. प्रामुख्याने प्राथमिक शाळांची संख्या अधिक असल्याने डीएडसाठी झुंबड उडत असे. आता शिक्षकाची पदेच भरल्या गेली नाही. अनेक वर्षांपासून राज्यात शिक्षक भरती होऊ शकली नाही. संच मान्यतेच्या आधारे भरती राबविल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाने अनेकवेळा जाहीर केले. पण संच मान्यता प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिलेले नाही. शासनाचा भरतीबाबत ठोस निर्णय नाहीच. ही स्थिती असल्याने डीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असल्याचे चित्र आहे. म्हणून प्रवेश अर्ज कमी होत चालल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

हेही वाचा – पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे रविवारपासून दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर

एकीकडे शिक्षकांची भरती नाही तर दुसरीकडे अनुदानित शाळा बंद पडू लागल्या आहेत. हजारो वर्ग तुकड्या व त्यावरील शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. त्यामुळे संच मान्यतेचा घोळ सुटता सुटत नसल्याचे म्हटल्या जाते. शिवाय केवळ शहरातच नव्हे तर तालुक्यातील छोट्यामोठ्या गावात इंग्रजी कॉन्व्हेंटचे पेव फुटले. मराठी शाळेत आपल्या पाल्यास शिकविण्याची मानसिकता ग्रामीण भागातही लोप पावल्याने या इंग्रजी शाळा ओसंडून वाहत आहेत. या शाळांमध्ये शिक्षकांसाठी डीएड पदवीका अनिवार्य नाही. बीएड पदवी पाहिल्या जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या शाळांमध्येसुद्धा डीएड पात्र शिक्षक नेमल्या जात नाही. नौकरीच मिळत नसल्याने डीएड करून करायचे तरी काय, असा प्रश्न केल्या जाताे. परिणामी डीएडच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त ठरू लागल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seats will remain vacant for ded pmd 64 ssb
Show comments