गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमाभागात झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. आज (दि.१६) सकाळी ९ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरूच होती. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.छत्तीसगडमधील बस्तरच्या सीमाभागात गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष कायम आहे. ६ जानेवारीला नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांचे वाहन उडवले होते. यात ९ जवान शहीद झाले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून १२ जानेवारीला ५ नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर आज आणखी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यंत्रणेला यश आले.

छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर भागात बिजापूर व सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर ही चकमक उडाली. ‘डीआरजी’ पथकाच्या जवानांनी गेल्या काही दिवसांपासून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे. त्यानुसार गुरुवारी बिजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर बिजापूर, सुकमा व दंतेवाडा येथील जवानांनी संयुक्त मोहीम राबवली. संयुक्त पथकामध्ये राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव दल (डीआरजी), विशेष कृतिदल (एसटीएफ), जिल्हा दल तसेच कोबरा २०४, २०५, २०६, २०८, २१० आणि केरीपू २२९ बटालियनच्या जवानांचा सहभाग होता. मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात १२ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले. सर्व जवान सुरक्षित आहेत. दरम्यान, संपूर्ण घडामोडींवर तिन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून आहेत.

हेही वाचा…केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

या ठिकाणी सकाळपासूनच सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. टप्प्याटप्प्याने झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर दिल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली असता १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. अद्याप शोधकार्य सुरूच आहे. त्यामुळे मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

Story img Loader