नागपूर : रायफल लोड करताना सुरक्षारक्षकाकडून अनावधानाने गोळी झाडली गेली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.घाट रोडवर युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. बाबाराव धंदर (५४) हे सीआरपीएफमधून निवृत्त झाले असून, ते पुण्यातील रेडियंट गार्ड प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून सुरक्षारक्षकाचे काम करतात. त्यांच्याकडे रायफलचा परवाना आहे.
दुपारी जेवणाच्या वेळी ते रायफलमधून काडतुसे बाहेर काढतात व जेवण झाल्यावर परत रायफल लोड करतात. दुपारी २ वाजताच्या सुमारास जेवण करून ते दोन बँक कर्मचाऱ्यांसह एटीएम रूममध्ये बसले होते. तेथे बसून ते रायफलमध्ये काडतुसे भरत होते. अचानक रायफलमधून गोळी चालली व एटीएमची काच फुटली.
हेही वाचा…गोंदियात रासायनिक पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही
मोठा आवाज ऐकून बँकेत खळबळ उडाली. सर्वांनी एटीएम रूमकडे धाव घेतली. या प्रकारामुळे बाबाराव व त्यांच्यासोबत बसलेले कर्मचारीदेखील हादरले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस तातडीने बँकेत पोहोचले. त्यांनी रायफल व काडतुसे जप्त केली. जर बंदुकीची नळी रस्त्याच्या दिशेने असती, तर निश्चितपणे कुणाला तरी गोळी लागण्याचा धोका होता.