नागपूर: उपचारासाठी आणलेल्या ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने सोमवारी रेल्वे रुग्णालयाच्या आवारात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला.
नातेवाईकानी रुग्णाच्या मृत्यूसाठी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. मृत नजमा खान या नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष हबीब खान यांच्या पत्नी आहेत. वैशाली नगर येथील रहिवासी हबीब खान यांच्या पत्नी नजमा खान यांची प्रकृती सोमवारी दुपारी अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसरात असलेल्या रेल्वे रुग्णालयात आणण्यात आले.
हेही वाचा… बुलढाण्याच्या दोन सुपुत्रांचा कझाकस्तानमध्ये डंका; ‘Iron Man’ स्पर्धा केली पूर्ण
हबीब खान म्हणाले की, रेल्वे रुग्णालयात डॉक्टर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. मुंबईहून नागपूरला पोहोचलेले एक डॉक्टर जेवायला गेले होते. तर नजमा यांची प्रकृती प्रत्येक क्षणाला बिकट होत होती. मुख्य वैद्यकीय अधिकार्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांनी तातडीने पत्नीच्या उपचारासाठी विनवणी केली. असे असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, आजारी नजमाचा रक्तदाब वाढला आणि तिचा मृत्यू झाला.