जळगाव: यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल विभाग व फैजपूर येथील पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले. दोन्ही डंपर जप्त करीत कासवे येथील एकाविरुद्ध फैजपूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान कासवेनजीकच्या नदीपात्राजवळ सुमारे १० ब्रास वाळूसाठाही जमा करण्यात आला. दरम्यान, मालमत्तांच्या माध्यमातून दंडापोटीची रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
यावल तालुक्यातील कासवे शिवरस्त्यावरील गट क्रमांक ८ मध्ये बंद स्टोन क्रशरजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, फैजपूर येथील पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक सय्यद मयनुद्दीन, मंडळ अधिकारी बबिता चौधरी, तलाठी एस. व्ही. सूर्यवंशी यांच्या पथकाला दिसून आले. या दोन्ही डंपरचे क्रमांक एमएच १९ सीवाय ४६४८ असे असून, दोन्ही वाहनांवर एकच क्रमांक टाकून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन्ही डंपर जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान कासवे येथील तापी नदीपात्राजवळ सुमारे १० ब्रास वाळूसाठाही महसूल पथकाला मिळून आला. तोही पंचनामा करून यावल येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संजय सपकाळे (रा. कासवे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा… लाल डोळा, जिभ्यासह सहा संशयित ताब्यात; धुळ्यातील शुभम साळुंखे खून प्रकरण
दरम्यान, यावल येथील तहसील कार्यालयामार्फत अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करून दंड आकारणी केलेली आहे; परंतु संबंधित वाहनमालकांनी अद्याप दंडापोटीच्या रकमेचा भरणा केला नसल्याने त्याअनुषंगाने तलाठ्यांना संबंधित वाहनमालकांच्या मालमत्ताविषयक माहिती संकलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित तलाठ्यांनी वाहनमालकांच्या नावे असलेले सातबारे उतारे सादर केले आहेत. आता संबंधित मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी फैजपूर येथील उपविभागीय अधिकार्यांकडे सादर केली आहे.