नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने मार्च २०२४ मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२च्या उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. मात्र, काही उमेदवार याविरोधात न्यायालयात गेल्यामुळे त्यावर स्थगिती येऊन नियुक्त्या रखडल्या होत्या. आता सर्व याचिका निकाली निघाल्या असून न्यायालयाने फेरनिवड यादी जाहीर करण्यावर कुठलीही बंधने घातलेली नाही. असे असतानाही ‘एमपीएससी’ने अद्याप फेरनिवड यादी जाहीर न केल्यामुळे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अन्य महत्त्वाच्या ६२३ पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे काहींवर सुरक्षा रक्षकाचे काम करण्याची तर काहींना खासगी शिकवणीमध्ये काम करण्याची वेळ आली आहे.

फेरनिवड यादी जाहीर करण्यात अडचण काय?

प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून लाखो विद्यार्थी पुणे, मुंबईसारख्या महानगरांमध्ये अभ्यास करत आहेत. परंतु, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कामकाज पुरते कोलमडल्याने उमेदवारांचे नैराश्य वाढत आहे. ‘एमपीएससी’ने २०२२ मध्ये २३ संवर्गातील ६२३ पदांच्या राज्यसेवा परीक्षेसाठी जाहिरात दिली. त्यानंतर पूर्वपरीक्षा ऑगस्ट २०२२ ला, मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये तर डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत मुलाखत कार्यक्रम पार पडला. १८ जानेवारी २०२४ ला गुणवत्ता यादी जाहीर झाली, तर २० मार्च २०२४ ला पदनिहाय अंतरिम यादी जाहीर झाली. यात अनेक उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी आदी महत्त्वाच्या पदांवर निवड झाली आहे. मात्र, न्यायालयातील याचिकामुळे नियुक्ती रखडली होती. आता या याचिका निकाली निघाल्या असून आयोगाने तात्काळ अंतिम फेरनिवड यादी जाहीर करावी व नियुक्त्या द्याव्या अशी मागणी स्टुटंट्स राईट्स असो. ऑफ इंडियाचे उमेश कोर्राम यांनी केली आहे. नियुक्त्या न दिल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा >>>नागपूर : मुख्यमंत्री म्हणाले ” राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करतात….”

नांदेडची पूजा घेते खासगी शिकवणी

बालविकास परियोजना अधिकारी म्हणून नांदेडच्या पूजा यांची निवड झाली. मात्र, पदनियुक्ती न मिळाल्याने कुटुंबाची घडी विस्कटू लागली आहे. आता घराच दहावीचे खासगी शिकवणी वर्ग घेऊन उदरनिर्वाह करत आहे.

साताऱ्याचा अजय सुरक्षा रक्षक

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अजय ढाणे यांनी रात्रपातळीची नोकरी करत यश मिळवले. पण दोन वर्षात नियुक्ती न मिळाल्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी करावी लागत आहे. तर सांगलीचा युवराज रिक्षा चालकाचे काम करीत आहे. लहानपणी आईचे आणि करोनात वडिलांचे छत्र हरपलेल्या सांगलीच्या युवराज मिरजकर याने रिक्षा चालवतच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. परीक्षा उत्तीर्ण करून सहायक गटविकास अधिकारी म्हणून यश मिळवले. मात्र, नियुक्ती रखडल्याने आजही रिक्षा चालवावे लागत आहे.