नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार या गावाची केंद्र सरकारने ‘संपूर्ण योग ग्राम’साठी निवड केली. राज्यातून निवडले गेलेले ते एकमेव गाव आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातून एका गावाला ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हे गाव एकदम प्रकाशझोतात आले आहे.
संपूर्ण योगा ग्राम होण्याचा मान मिळालेल्या खुर्सापार (काटोल तालुका) ग्रामपंचायतीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केली असून याबाबत ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जलसंधारणातही ग्रामपंचायतीचे काम उल्लेखनीय आहे. या कामाच्या आधारावरच या गावाची शिफारस राज्याने केंद्राकडे केली आहे. हे गाव आता ‘संपूर्ण योग ग्राम’ म्हणून विकसित केले जाणार आहे.
हेही वाचा – नागपुरात योगदिन उत्साहात; गडकरी, बावनकुळे यांची उपस्थिती
यासंदर्भात सरपंच सुधीर गोतमारे म्हणाले, गावाची निवड झाल्याबद्दल शासनाच्यावतीने कळवण्यात आले तेव्हा आनंद झाला. हा नवा उपक्रम आहे. शासनाने योग प्रचारासाठी कार्यक्रम आखून दिला आहे. त्यानुसार तो राबवला जाईल. ‘संपूर्ण योग ग्राम’ हा आयुष मंत्रालयाचा उपक्रम आहे. वर्षभर योग प्रसाराच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी येथून होण्याची शक्यता आहे.