अकोला : देशातील सहा विशेष जिल्ह्यांमध्ये वाशीमची निवड ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्ह्याला एक नवी ओळख निर्माण करून देणारा उपक्रम ठरणार आहे. कृषी क्षेत्रात ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचा उपयोगाचा प्रयोग वाशीम जिल्ह्यात केला जाईल. महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा म्हणून वाशीमची निवड झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने डिसेंबर २०२२ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय जिओस्पेशियल धोरणांतर्गत भारताला ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानात प्रगत होण्याचे उद्दिष्ट ठेवले. या उपक्रमाद्वारे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा मुख्य हेतू आहे. जून २०२५ पर्यंत देशातील पाच राज्यांतील सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील वाशीम, उत्तर प्रदेशातील वाराणसी, हरियाणातील सोनीपत आणि गुरुग्राम, आसाममधील कामरूप आणि आंध्र प्रदेशातील विजयनगर यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याला विशिष्ट क्षेत्रांशी संबंधित आव्हानांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. वाशीम जिल्ह्यात कृषी क्षेत्रात ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.

प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान आणि उपाय उपलब्ध होतील. प्रकल्पात ड्रोनच्या साहाय्याने कृषी क्षेत्रात केवळ उत्पादनच वाढणार नाही, तर शेतकऱ्यांच्या श्रम आणि खर्चातही बचत होईल. जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण होईल. या प्रकल्पामुळे पीक उत्पादन, मातीचे संरक्षण आणि पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. शेतकरी, युवक आणि महिलांना ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील समस्य व प्रश्नांवर ड्रोनद्वारे अचूक माहिती गोळा करून उपाययोजना करण्यात येईल. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत, त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी

वाशीम जिल्हा निती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला. वाशीम सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यामुळे विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते. या परिस्थितीत ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे.

‘ऑपरेशन द्रोणागिरी’मुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला जाईल. ड्रोनच्या माध्यमातून अचूक फवारणी, पिकांचे आरोग्य निरीक्षण, आणि कीड व रोग व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होईल. याशिवाय, स्थानिक युवक आणि महिलांना ‘जिओस्पेशियल’ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हा उपक्रम एक ‘गेम-चेंजर’ ठरेल, याचा आम्हाला विश्वास आहे. – बुवनेश्वरी एस, जिल्हाधिकारी, वाशीम.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of only washim district from maharashtra for operation dronagiri pilot project know the features ppd 88 ssb