बुलढाणा: घरची जेमतेम स्थिती, आईचे अपार कष्ट, सुविधांचा अभाव, अशा प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करणारे सख्खे भाऊ पोलीस दलात दाखल झाले आहेत. या दोन्ही भावंडांचे व त्यांच्यासाठी आजतागायत कष्ट करणाऱ्या मातेचे मोताळा तालुक्यात कौतुक होत आहे.
मोताळा हे तालुक्याचे ठिकाण असले तरी सरावासाठी हव्या त्या सुविधा येथे उपलब्ध नाहीत. मात्र, याची तमा न बाळगता दोघा भावंडांनी पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले. त्याला त्यांचे परिश्रम, कठोर सराव आणि आईचे आशीर्वाद याचे पाठबळ मिळाले. वैभव व अभिषेक खोटाळे पाटील, अशी पोलीस दलात निवड झालेल्या भावंडांची नावे आहे.
हेही वाचा… नागपुरातही मराठा आरक्षण आंदोलन पेटले, गणेशपेठमध्ये टायर पेटवले
त्यांच्या मातोश्री सुनीता पाटील यांनी सुरुवातीला मोताळा ग्रामपंचायत आणि नंतर नगरपंचायतमध्ये कर्मचारी म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. पोटाला चिमटे घेत मुलांच्या स्वप्नासाठी सर्वस्व पणाला लावले. मुलांनीसुद्धा अपार परिश्रम करीत स्वतःसह आईच्या स्वप्नांची पूर्ती केली.
हेही वाचा… १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट आयटी कंपनीत नोकरी, वाचा काय आहे प्रकरण
वैभव लक्ष्मण पाटील ह्याने २०१९ मध्ये नागपूरमध्ये झालेल्या पोलीस भरतीमध्ये भाग घेतला. त्यात तो यशस्वी ठरला. त्याची एसआरपीएफ नागपूर येथे गेल्यावर्षी निवड झाली असून नुकतेच प्रशिक्षणही पूर्ण झाले. अभिषेक मुंबईत झालेल्या पोलीस भरतीत सहभागी झाला. त्याचे स्वप्न ५ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर झालेल्या निकालाअंती पूर्ण झाले. त्याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. दोघांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मोताळा येथेच झाले आहे.