नागपूर: उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, निकामी टायर्स आदी साहित्यांपासून अनोखे सेल्फी पाॅईंट साकारण्यात आले आहे. तेथे छायाचित्र काढण्यासाठी तपासणीला येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक गर्दी करत आहे.
एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या संकल्पनेतून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. एम्समध्येही टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या, वाहनांचे निकामी टायर, प्लास्टिक कचरा नष्ट कसा करायचा ही एक समस्या होती. रुग्णालयात येणाऱ्यांकडून मोकळ्या जागेत कचरा टाकण्यात येत होता. या सर्वांवर पर्याय म्हणून व कचऱ्यातून सौंदर्य फुलवणे शक्य असल्याचा संदेश नागरिकांना देण्यासाठी डॉ. श्रीगिरीवार यांनी वरील उपक्रम हाती घेतला.
हेही वाचा – गडचिरोली : दारूबंदीवरून विरोधासह समर्थनाचेही सूर! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे
टाकाऊ प्लास्टिक बाटल्या, टायरचे तुकडे, सर्जिकल रसायनांचे डबे, पीपीई किट्स, तुटलेले वाॅश बेसिन, टाॅयलेट सीट्चा वापर करून त्यात
त्यांनी सुंदर झाडे फुलवली. या सर्व झाडांसह साहित्यांना आकर्षत पद्धतीने ठेऊन त्याचा एम्समध्ये एक सुंदर सेल्फी पाॅईंट तयार करण्यात आला. यातून नागरिकांना कचऱ्यातून कलेचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एम्सच्या डॉ. नीलम, ज्योती लाटवाल आणि चचाणे यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले.
हेही वाचा – सावधान! ‘या’ राज्यांमध्ये आजपासून पुन्हा अवकाळी बरसणार!
“एम्स अथवा इतरही संस्थांमध्ये प्लास्टिकसह इतरही कचऱ्याची विल्हेवाट हा चिंतेचा विषय आहे. या कचऱ्याच्या पुनर्वापरातूनही सौंदर्य फुलवणे शक्य आहे. एम्सच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ही कल्पना वास्तवात आणून दाखवली. शहरात या पद्धतीचे सौंदर्यीकरण नागरिकांना कचऱ्याचा सदुपयोग करण्याचा संदेश देऊ शकेल. त्यासाठी समाजाने सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.” – प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार, वैद्यकीय अधीक्षक, एम्स, नागपूर.