नागपूर : ग्रामपंचायत स्तरावरील ‘माझी माती, माझा देश’ (मेरी माटी मेरा देश) अभियानाची बुधवारपासून सुरूवात झाली. यामध्ये शहिदांचे शिलाफलक उभारण्यात आले असून त्यावर पंतप्रधानांचा श्रद्धांजली संदेश लिहिण्यात आला आहे. ‘पंच प्रण’ असलेल्या फलकावर पंतप्रधानांचे छायाचित्र आहे. नागरिकांनी हातामध्ये माती घेऊन या छायाचित्रासह घेतलेला ‘सेल्फी’ सरकारी संकेतस्थळावर टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या प्रसिद्धीचा झोत गावा-गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारंभानिमित्त केंद्र सरकारच्यावतीने देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात, बुधवार ९ ऑगस्टला क्रांतीदिनापासून झाली असून ते ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहील. गावातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना शिलाफलक उभारायचे आहेत. त्यावर मोदी यांच्या संदेशासोबतच संबंधित गावातील स्वातंत्र्य लढय़ातील हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक, संरक्षण, पोलीस विभागातील शहिदांची नावे लिहिण्यात येणार आहेत. या अभियानात ‘अमृत काल के पंच प्रण’ हा आणखी एक उपक्रम आहे. यात देशाला २०४७ पर्यंत ‘आत्मनिर्भर’ करण्याबाबतची शपथ असून नागरिकांनी तिचे वाचन करायचे आहे. या फलकाजवळ माती हाती घेऊन मोदींच्या छायाचित्रांसह सेल्फी काढून ते सरकारी संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. या अभियानात नागपूर विभागात ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. आपला देश व माती विषयी प्रेम निर्माण व्हावे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून मोदी यांचा संदेश गावपातळीपर्यंत पोहचवण्याचा उद्देश दिसून येतो.
‘मनरेगा’चा हातभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिचा उल्लेख ‘अपयशाचे स्मारक’ असा केला होता त्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (मनरेगा) योजनेतून हे शिलाफलक उभारण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. याचा सर्व खर्चही मनरेगाच्या माध्यमातून केला जाणार आहे, तसेच उपक्रम राबविण्याची जबाबदारीही ग्रामपंचायत, गटविकास अधिकाऱ्यांसह मनरेगा अधिकाऱ्यांवरही असेल.