पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती विक्रेत्यांवर महापालिका प्रशासनाने अनेक निबर्ंध लावलेले असताना चितारओळीसह शहरातील विविध भागात शाडू मातीच्या नावावर ‘पीओपी’च्या मूर्तीची विक्री केली जात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र अशा विक्रेत्यांवर काहीच करीत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात ५० हजारांपेक्षा जास्त ‘पीओपी’च्या गणपतीच्या मूर्ती दाखल झाल्या असून शहरातील विविध भागात आता स्टॉल लावण्यात आले आहेत. धंतोली, रामदासपेठ, प्रतापनगर, गोकुळपेठ या भागात चितारओळीमध्ये विक्रेत्यांनी दुकाने थाटली ्असून त्या ठिकाणी शाडू मातीच्या नावावर ‘पीओपी’च्या मूर्तीची विक्री केली जात असून लोकांची फसवणूक केल्या जात आहे. चितारओळीमध्ये या संदर्भात जनजागृती करण्यासाठी बॅनर आणि होर्डिग्ज लावण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘पीओपी’च्या मूर्तीमागे लाल रंगाची खूण करणे आवश्यक आहे. सोबतच दुकानात ‘पीओपी’च्या मूर्तीची विक्री केली जात आहे, असे फलक लावणे, मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याबाबत सूचना ग्राहकांना करणे बंधनकारक आहे. मात्र, या बाबींचे पालन विक्रेत्यांकडून केले जात नाही. चितारओळीमध्ये मिळेल त्या जागी दुकाने थाटली असून त्या ठिकाणी स्थानिक मूर्तीकार आणि ‘पीओपी’ मूर्ती विकणाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे.
‘पीओपी’च्या मूर्तीमुळे स्थानिक मूर्तीकारांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. मानेवाडा, हुडकेश्वर, जागनाथ बुधवारी, नंदनवन, जयताळा, सक्करदरा, महाल, सदर, पाचपावली, बडकस चौक आणि चितार ओळ परिसरात ‘पीओपी’च्या मूर्तीचे स्टॉल्स मोठय़ा संख्येने लावण्यात आले असले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र त्याबाबत कारवाई सुरू केली नाही. १ सप्टेंबरपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाने झोन पातळीवर कारवाई करणार असताना त्याची सुरुवात झाली नाही, त्यामुळे ‘पीओपी’च्या मूर्ती विक्रेत्यांचे चागलेच फावते आहे. यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीसाठी तलावाच्या ठिकाणी आणि शहरातील विविध प्रभागांमध्ये कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. दरवर्षी हजारोच्या संख्येने ‘पीओपी’च्या मूर्ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी तलावांबाहेर काढल्या जातात त्यामुळे या मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे त्या विकत घेऊ नका, असे आवाहन काही पर्यावरण आणि सामाजिक संघटनांनी केले आहे. परंतु, त्याला जनतेकडून फारसा प्रतिसाद मिळात असलेला दिसून येत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा