नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या कच्चेपार येथील वनविभागाच्या नाक्यावर दुर्मिळ असलेला ‘फोस्र्टेन कॅट स्नेक’ हा निमविषारी साप आढळून आला. ब्रह्मपुरी वनविभागात पहिल्यांदाच या सापाची नोंद झाली आहे. दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.
तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात कच्चेपार येते. येथे वनविभागाचा नाका आहे. नाक्यावरील चौकीदाराने पंखा सुरू केला. मात्र, पंखा फिरला नाही. त्यामुळे चौकीदाराने वर बघितले. पंख्यावर चौकीदाराला एक लांबलचक तपकिरी रंगाचा साप दिसला. त्याने याची माहिती स्वाब नेचर केअर संस्थेच्या सर्पमित्रांना दिली.
हेही वाचा >>> चंद्रपूर: नागपूर-हैदराबाद ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ होणार सुरू
माहिती मिळताच सर्पमित्र आले. त्यांनी बघितले असता फार्टेन कॅट स्नेक असल्याचे दिसून आले. फोस्टेंन कॅट स्नेक हा निम विषारी’ आहे. त्याच्या तपकिरी रंगाच्या शरीरावर मानेपासून शेपटीपर्यंत फिक्कट पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. घोनस सापाच्या डोक्याप्रमाणे त्रिकोणी आकाराच्या डोक्यावर डोळे हे मोठे आणि उठुन दिसतात.
हा साप शरीराच्या मानाने लांब असतो. अत्यंत शांत स्वभावाचा निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो. झाडाच्या खोलीत अंडे देऊन मादा साप ही त्या अंड्याच्या आसपास राहतो. सरडे, पाली, पक्षांचे अंडे, पक्षांचे पिल्ले खातो. मात्र या सापाबद्दलची जास्त ओळख नसल्यामुळे किंवा याला मराठीत असे काही विशेष नाव नाही आहे. ब्रह्मपुरी वनविभागामध्ये पहिलीच नोंद तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात करण्यात आली आहे. या सापाला सुरक्षितरित्या सोडण्यात आले. याप्रसंगी सर्पमित्र यश कायरकर, महेश बोरकर, जिवेश सयाम, वनरक्षक एस.एस. गौरकर, वनरक्षक एस. बी. पेंदाम हे उपस्थित होते.