नागपूर : इटालियन परिवारात जन्मलेलेले राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भारत जोडो यात्रा निघणार नाही अशा पद्धतीने काँग्रेस आणि राहुल गांधी यांना त्यांची जागा दाखवून द्या, इटलीचे पार्सल इटलीला परत पाठवा, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्यावतीने संविधान चौकात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसी आघाडीचे प्रभारी आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत काँग्रेस पक्षाचा निषेध करण्यात आला.

हेही वाचा – नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’, रामटेक पुन्हा चर्चेत, काय आहे कारण?

यावेळी बावनकुळे म्हणाले, राहुल गांधीनी यापूर्वी ओबीसी समाजाचा अपमान केल्यामुळे त्यांना दोन वर्षे शिक्षा झाली. त्यांची खासदारकी गेली होती मात्र न्यायालयाने परत खासदारकी दिली. राहुल गांधी वारंवार ओबीसीचा अपमान करत आहे. काँग्रेसने १९८० मध्ये मंडल आयोगाचा अहवाल मान्य केला नाही. त्यावेळी ओबीसींना आरक्षण देणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर व्ही.पी. सिंग सरकार आले आणि मंडल आयोग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केवळ अपमान नाही तर समस्त ओबीसी समाजाचा हा अपमान आहे. हा अपमान विसरायचा नाही. ओबीसी समाजामध्ये या अपमानाची आग तयार करायची आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वत: ओबीसीचे कैवारी समजून घेतात त्यांना हा राहुल गांधी यांनी केलेला अपमान चालतो का. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे. शिवाय विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांचा निषेध केला पाहिज. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा – गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा राज्यभर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला. यावेळी आमदार प्रवीण दटके, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे. शहर अध्यक्ष बंटी कुकडे, अनिल नेताम, अश्विनी जिचकार, गिरीश व्यास, अर्चना डेहनकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send parcel from italy back to italy says chandrashekhar bawankule what did he say about rahul gandhi in nagpur vmb 67 ssb
Show comments