बुलढाणा : जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही आणि वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासन ढिम्म असल्याने अखेर वृद्ध कलावंतांनी आज प्रेतयात्रा आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी ‘प्रेत’ ताब्यात घेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र, आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कलावंत व युवा स्वाभिमानीचे प्रदेश नेते ईश्वर सिंह चंदेल यांनी बोलून दाखविला.
स्थानिय विश्रामगृह येथून आज दुपारी समाजकल्याणचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. खांद्यावर हुबेहुब वाटणारी तिरडी, प्रेत आणि समोर ‘राम नाम सत्य है’ असा जप करणारे शोकाकुल कलावंत, कार्यकर्ते अशी यात्रा होता. मात्र, बुलढाणा पोलिसांनी तात्काळ धाव घेत तिरडी ताब्यात घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना चंदेल म्हणाले की, वयोवृद्ध कलावंत मानधन योजनेत आर्थिक व प्रशासकीय घोळ झाल्याचा वृद्ध कलावंत यांचा आरोप आहे. तीन वर्षात तीनशे कलावंताची निवड होणे आवश्यक आहे. मात्र, २६३ कलावंतांचीच निवड करून देवाणघेवाण करण्यात आली. जिल्हाधिकारी व वरिष्ठांना निवेदने देऊन व आंदोलने करूनही काहीच कारवाई झाली नाही, कलावंतांना न्याय मिळाला नाही. यामुळे समाजकल्याणच्या अधिकारी व कर्मचाऱ्याची प्रेतयात्रा काढण्यात आली. पोलिसांनी आज रोखले तरी आंदोलन सुरूच राहणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.