लोकसत्ता टीम
अमरावती: वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजूर करून देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली.
रुपेश प्रतापसिंग ठाकूर (३३) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी तक्रारकर्ते हे मानोली येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या आजारी वडिलांवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यासाठी आलेल्या ३ लाख ३७ हजार ९१८ रुपयांच्या खर्चाचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजूर करून देण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात कार्यरत वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर याने त्यांना १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
हेही वाचा… भरमसाठ वीज देयक आले, आपणच आपले देयक तपासा… पद्धत काय?
तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीत रुपेश ठाकूर याने तडजोडीअंती १३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक विभागाच्या कक्ष क्रमांक ४ मध्ये सापळा रचून रुपेश ठाकूर याला तक्रारकर्त्याकडून १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. त्याच्याविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेशकुमार दंदे व अमोल कडू, नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू, सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू यांनी केली.