चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळात संख्याबळ अधिक असेल तर त्यांचा अन्यथा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता होईल, असे स्पष्ट मत माजी विरोधी पक्ष नेते, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेपासून दूर सारायचे असेल तर मोठा भाऊ, छोटा भाऊ हा वाद करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व ठाकरे गत या तिन्ही पक्षांनी एकत्र येत भाऊ म्हणून लढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील राजकीय घडामोडींवर माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे डिमोशन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ जण भाजपा-शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेेता राहू शकत नाही. तरीही विधीमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ तपासून घेत, त्यांची संख्या अधिक असेल तर त्यांचा अन्यथा काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होईल. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐनवेळी त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. आता अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे उपमुख्यमंत्रीपदाची विभागणी करण्यात आली. येथेही फडणवीस यांचे डिमोशन झाले आहे. पूर्वी ते एकमेव उपमुख्यमंत्री होते. आता त्यांच्या सोबत अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत. पवार व फडणवीस हे दोन्ही नेते राज्याच्या राजकारणात टेरर आहेत.
हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी जाहीर, यापुढे परीक्षा…
बैल बंडीला बैल जुंपतात. या दोन्ही बैलापैकी एक बैल कमजोर असला की दुसरा बैल त्याला सोबत ओढत नेतो. मात्र येथे दोन्ही नेते समान ताकदीचे आहेत. त्यामुळे येथे दोघेही दोन दिशांना पळण्याचा प्रयत्न करतील.तेव्हा बैलबंडी हाकणाऱ्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जातील, पुणे, नागपूर किंवा अन्य ठिकाणाहून लोकसभा निवडणुक लढतील अशी केवळ चर्चा आहे. याबाबतची वस्तुस्थिती फडणवीस यांनाच माहिती असेही वडेट्टीवार म्हणाले.