नागपूर : संविधानावर वेळीवेळी हल्ले होत आहे. आज संविधान वाचवण्याची प्राधाण्याने गरज असून त्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी लिलाताई चितळे यांनी व्यक्त केले.

समाजात शांतता आणि सलोखा निर्माण व्हावा यासाठी महिलांनी पुढाकार घेत ‘अमन आणि शांतीसाठी हा महिला जत्था’ कार्यक्रम घेतला.

जनवादी महिला संघटनेच्यावतीने नागपूरसह विदर्भातील महिलांचा हा जत्था बुधवारी दीक्षाभूमी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण निघाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शासनाचे डोळे उघडण्यासाठी अशा जत्थ्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी जनवादी महिला संघटनेला पाच हजार रुपयाची देणगीही दिली

संविधानाने देशाच्या नागरिकांना काही मूलभूत हक्क दिले आहे, हे मूलभूत हक्क चिरडण्याचे प्रकार अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असून जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्रावर गदा आणली जात असल्याचे लिलाताईंनी सांगितले. जनसुरक्षा कायदा द्वारे संविधानाने जनतेला दिलेला अभिव्यक्तीचा, आपले मत मांडण्याचा तसेंच आंदोलनाचा अधिकार हिरवण्याचा सरकारचा डाव असल्याचेही  त्यांनी सांगितले.

आजची प्रासंगिकता समाज सुधारकांच्या विचाराची आणि त्याला जोड बाबासाहेबांच्या संघर्षाची आहे. त्यासाठी विध्यार्थी, कामगारांसोबत महिलांनीही बरोबरीने सहभागी होऊन बाबासाहेबांचा हा लढा पूर्णत्वास न्यायला हवा असे मत संघटनेच्या राज्य कमिटी अध्यक्षा नसीमा शेख यांनी जत्थ्याच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.

पुरुषी वर्चस्वाच्या बळी गेलेल्या महिलांची मालिका तर संपतच नाही. यांत सर्वाधिक अत्याचार हे सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांचे नेते आणि सगेसोयरे या समाजाच्या आणि बाबा-बुवा-पुजारी या धर्माच्या ठेकेदारांकडून तसेच ओळखी-नातेसंबंधातून होतात. त्याचे खापर मात्र महिलांनी नोकरी करणे, उशिरा घरी येणे, पाश्चात्य कपडे घालणे, प्रेम विवाह करणे यांवर फोडण्याचा निर्लज्ज प्रयत्न होतो अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आणि देशात विविध कारणांमुळे सामाजिक तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर येथे जनवादी महिला संघटनेच्या विदर्भातील कार्यकर्त्या आणी नेत्यांनी एकत्र येऊन हा सामाजिक न्याय जत्थ्याची  भूमिका महत्वपूर्ण ठरते असे मत जनवादीच्या राज्य सहसचीव काकडे या म्हणाल्या.

आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर आज महाराष्ट्राला संतांच्या समतावादी परंपरेचा विसर पडला की काय, अशी शंका येते. महागाई, बेरोजगारी, धर्माच्या आणि जातीच्या नावाने होणारे दंगे, महिलांवर होणारे अत्याचार, खून, मारामारी, खंडणीखोरी, व्यसनाधीनता या सर्व प्रश्नांनी राज्याला घेरले असल्याचे सांगितले.